बंद घर फोडले : 21 हजारांचा ऐवज चोरीला

भुसावळ : बंद घरांना टार्गेट करीत शहरात चोर्‍या सुरू झाल्याने रहिवासी धास्तावले आहे. शहरातील विठ्ठल मंदीर वॉर्डातील महाराष्ट्र बँकेजवळील प्रकाश यादव बर्‍हाटे हे मुलीच्या लग्नासाठी पुण्याला गेले असता चोरट्यांनी बंद घरातून चांदीची भाडे, पाच हजार रुपये रोख व होम थिएटर मिळून 20 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घरांना टार्गेट
बर्‍हाटे हे 14 मे रोजी पुण्याला गेल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागील बाजूने आत प्रवेश करीत वरच्या मजल्यावरून शिडी लावून चोरटे खाली उतरले. चोरट्यांनी बर्‍हाटे यांच्या घरातील साहित्याची फेकाफेक केली. देवघरातील चांदीचे ताट, तांब्या, पाच हजारांची चिल्लर, सीसीटिव्ही कॅमेरे, होम थिएटर असा ऐवज चोरून नेला. बर्‍हाटे हे मंगळवारी पुण्यातून घरी आल्यावर त्यांनी चोरीची घटना समजली. त्यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.