भारीप पदाधिकार्यांची एडीआरएम सिन्हा यांच्याशी चर्चा ; शेगावसाठी ‘इंटरसिटी एक्स्प्रेस’ ची मागणी
भुसावळ- बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या तातडीने सुरू करून रेल्वे प्रवाशांची गैरसोय थांबवावी तसेच श्री क्षेत्र शेगावसाठी नागपूर-भुसावळ इंटरसिटी एक्सप्रेस सोडण्यात यावी तसेच शेगाव स्थानकावर प्रवाशांना पायाभूत सुविधा मिळाव्या, तसेच शेगावात सर्व एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्यावा, आदी मागण्यांसाठी भारीप बहुजन महासंघाच्या पदाधिकार्यांनी गुरुवारी एडीआरएम मनोज सिन्हा यांची भेट घेत साकडे घातले.
पॅसेंजर बंदमुळे प्रवाशांना मनस्ताप
शेगाव येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी जातात शिवाय गोंदिया ते मुंबई भागातून येणार्या भाविकांची संख्या मोठी आहे मात्र सध्या भुसावळातून सोडल्या जाणार्या नागपूर, अमरावती आणि वर्धा पॅसेंजर तांत्रिक कामांसाठी बंद करण्यात आल्याने प्रवाशांना एक्सप्रेस गाड्यांशिवाय पर्याय नाही व त्यामुळे मोठा आर्थिक फटका त्यांना बसत आहे. शेगाव स्थानकावर बर्याच एक्स्प्रेस गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. मुंबई येथून येणार्या भाविकांसाठी गीतांजली एक्सप्रेस ही एकमेव गाडी आहे. भुसावळ येथून शेगावला जाणार्या भाविकांसाठी महाराष्ट्र, अहमदाबाद-हावडा आदी एक्स्प्रेस गाड्या आहेत तर गोंदियावरुन शेगावला जाण्यासाठी केवळ गीतांजली व महाराष्ट्र या दोनच गाड्या आहेत. पॅसेंजर बंद असल्याने सध्या या गाड्यांमध्ये गर्दी वाढली आहे. अपूर्ण जनरल कोचमुळे प्रवाशांना उभे राहण्याही जागा नसते. यामुळे गोंदिया, नागपूर व मुंबई दरम्यान अप व डाऊन मार्गावर इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली तसेच रेल्वे प्रशासनाने शेगाव स्थानकावर प्रवाशांसाठी प्रसाधनगृहे, शौचालयाच्या मूलभूत सुविधा द्याव्या, सर्व गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर थांबा द्यावा, पॅसेंजर गाड्या सुरू कराव्या, अशी मागणी भारीप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, तालुकाध्यक्ष रुपेश साळूंके, सुदाम सोनवणे, बबन कांबळे, प्रमोद बावस्कर, गणेश इंगळे, तुषार जाधव, अरुण नरवाडे, महेंद्र शेजवळकर, नीलेश जाधव, विद्यानंद जोगदंड, दिलीप सुरवाडे, प्रल्हाद घारु, बालाजी पठाळे, जितू वराडे, सुनील ठाकूर, संतोष कोळी यांनी केली.
मागण्या पूर्ण न झाल्यास ‘रेल रोको’ चा इशारा
भारीप महासंघाच्या पदाधिकार्यांनी मांडलेल्या मागण्यांची त्वरीत पूर्तता न झाल्यास भारीपतर्फे रेलरोको आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला. शेगावल्या जाणार्या भाविकांची संख्या वाढत असून रेल्वे प्रशासनाने उत्पन्नवाढीच्या दृष्टीने या मार्गावर इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू केल्यास, सुविधेत भर पडणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे म्हणाले.