बंद बंगला चोरट्यांनी फोडला

0

नवापूरातील शेफाली पार्कला 50 हजाराची घरफोडी
नवापूर ।
शहरातील शेफाली पार्क येथे एका कापड व्यापार्‍याचे बंद घर फोडून चोरट्यांनी 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना भरदिवसा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुपारी कडक उन्हामुळे या परिसरात सामसूम असते. बंद घरे फोडण्याचे सत्र सुरूच आहे. यामुळे कॉलनी परिसरातील रहिवाशी भयभीत झाल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. याबाबत पोलिसात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील शेफाली पार्क परिसरात कापड व्यापारी रुपेश सतीश पाटील आणि त्यांची पत्नी प्रा.योगिता पाटील हे वास्तव्यास आहे. त्यांची पत्नी प्रा.योगिता पाटील या नाशिक येथे गेल्या होत्या. तर व्यापारी रुपेश पाटील हे त्यांच्या लिमडावाडी परिसरातील कापड दुकानात गेले होते. बंद घर असल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराला लक्ष केले. बंद घराच्या कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत कपाटात असलेले 40 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व दहा हजार रुपये रोख रक्कम लंपास केले. दुकानाचे कामकाज आटोपून रुपेश पाटील घरी आल्यावर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ नवापूर पोलीस स्टेशनला माहिती कळवली. प्रा.योगिता पाटील या नाशिकहुन दुपारी नवापूर येथे घरी आल्यावर काय चोरीस गेले, हे समजले.घटनास्थळी पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत रुपेश पाटील यांनी नवापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास हे.काँ. महेंद्र नगराळे करत आहे.

बंद घरांना चोरट्यांनी केले लक्ष्य
सुटीनिमित्त अनेक नोकरदार बंद घर करुन आपल्या मूळगावी तर कोणी लग्नाला, फिरायला गेले आहेत. हीच संधी साधून टेहळणी करत चोरटे घरफोडी करत आहे. मांदा सोयायटीमध्ये ही एका व्यापार्‍याचे भर दिवसा बंद घर फोडून सोन्याचे दागिने लंपास केले होते. आता शेफाली पार्क येथील बंद घर फोडले. रात्रीऐवजी आता चोरट्यांनी बंद घरांना दिवसाच लक्ष्य केल्याचे यावरुन सिध्द झाले आहे.