नवापुर । तालुक्यातील मौजे बंधारे ग्रामपंचायत मधील भ्रष्ट कारभार, शासन योजनांमधील निधीचा अपहार याबद्दल चौकशी करुन संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कल्लशेटी यांना बंधारे ग्रामस्थ यांनी केली आहे. नवापुर तालुक्यातील बंधारे ग्रामपंचायतींच्या भ्रष्ट कारभाराबद्दल पुराव्यानिशी अनेक तक्रार अर्ज ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी तसेच तहसिलदार नवापुर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना वेळोवेळी सादर करुन चौकशीची मागणी केलेली आहे. परंतु अद्याप एकदाही चौकशी झालेली नाही.
मयताचे नावाने काढले पैसे
ग्रामस्थांनी 23 ऑगस्ट रोजी दिलेल्या अर्जामध्ये योजनेचे नाव,बोगस लाभ घेणार्या व्यक्तींच्या नावाचा अनुक्रमांक आणि अशा व्यक्तींचे नाव यासहीत तसेच योजना मंजुरीच्या याद्या अशी सर्व तपशिलवार माहिती चौकशीकामी उपलब्ध करुन दिलेली आहे. मयताच्या नावाने शौचालय बांधकामाचे पैसे काढले आहेत, घरकुल बांधलेले नसतांना पुर्णपणे अनुदान दिले आहे. एकाच व्यक्तीच्या नावाने अनेकदा घरकुले मंजुर केलेली आहेत. ग्रामपंचायत सदस्यांनी घरकुल बांधलेच नाही. फक्त पैसे काढुन घेतले. जन्म होण्याआधीच 8 नंबर मध्ये नोंदी घेतलेल्या आहेत. गाव नमुना 8 मध्ये नोंद नाही तरीदेखील घरकुलाचा लाभ दिला आहे. शौचालय बांधकामात भ्रष्टाचार करण्यात आला आहे. ग्राम पंचायतीचे ग्रामसभा कोश खाते 60193358922 असा आहे. या खात्याचे 1/1/2014 ते 29/8/2017 या कालावधीचे स्टेटमेन्टमधे खालील व्यक्तींना दिलेल्या रक्कमा का आणि कशासाठी दिल्या त्याबद्दल तपशिल नाही. सर्व रकमा संशयास्पद आहेत.
भ्रष्टाचार दाबण्याचा प्रयत्न
भ्रष्ट कारभाराची चौकशी करुन कारवाई करण्याऐवजी गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर व ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामसेवक आणि पंचायत समितीमधील संबधीत विभागाचे कर्मचारी हे भ्रष्ट सरपंच आणि सदस्यांना पाठीशी घालण्याचा भ्रष्टाचार दडपुन टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.