पारोळा : शेतकर्यांच्या पशूधनावर डल्ला मारणार्या बकरी चोरट्यांना पारोळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी तब्बल 17 चोर्या केल्याची कबुलीही दिली असून सहा गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पारोळा पोलिसात दाखल होता गुन्हा
शहरातील भैय्या सुदाम चौधरी यांच्या वंजारी शिवारातील शेतातून अज्ञात चोरट्यांनी 25 बकर्यांची चोरी झाल्याचे 1 ऑगस्ट रोजी उघडकीला आले आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पारोळा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयीत आरोपी महेंद्र उर्फ गणेश सुदाम पाटील (28), वाल्मिक भगवान मराठे (24), संजय सोमा जाधव (27), अंकुश नेहरू पाटील (23), रोशन महावीर पवार (19 सर्व रा. पळासखेडा, ता.पारोळा) आणि शिवाजी रामराव पाटील (25, रा. जामोद, ता.जि.जळगाव) यांना अटक करण्यात आली तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. या गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने जप्त करण्यात आली. सर्वाना पारोळा न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, संशयीत आरोपींनी 17 गुन्ह्यांची कबुली दिली असून यातील सहा गुन्ह्यांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
यांनी केली कारवाई
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, आयपीएस ऋषीकेश रावले, विभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, उपनिरीक्षक राजू जाधव, शेखर डोमाळे, जयवंत पाटील, हवालदार सुनील वानखेडे, प्रवीण पाटील, संदीप सातपुते, किशोर भोई, अभिजीत पाटील, राहुल कोळी, राहुल पाटील, हेमचंद साबे आदींनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.