अमरावती : शेतकऱ्यांना साले म्हणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी जालना येथून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. जालन्यातून दानवेंचा पराभव करूनच परत येऊ, असा निर्धारही बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दानवे यांच्यासमोर आमदार बच्चू कडू याचं मोठं आव्हान असणार आहे.
आमदार बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.दानवे हे शेतकरी विरोधी आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवत शेतकऱ्यांच्या हितासाठीच ही निवडणूक लढवत असल्याचे बच्चू कडू म्हणाले.
निवडणूक लढवण्यासाठी बच्चू कडू यांनी जालना लोकसभा मतदारसंघाची बांधणी सुरू केली असून कार्यकर्त्यांशी संवाद साधतानाच त्यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही सोपवण्यात आल्या आहेत. त्यासोबतच कडू यांनी जालन्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची माहितीही मागवली आहे. दानवे यांच्या मतदारसंघात अवैध दारुची विक्री होत असून रेतीची तस्करीही सुरू आहे. जालन्याची अवस्था बिहारपेक्षाही वाईट असल्याचं बच्चू कडू यांनी म्हंटले आहे.