बडतर्फ पोस्ट कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत घ्या

0

पुणे । पोस्टमन, मेलगार्ड पदावर असणार्‍या 395 कर्मचार्‍यांना पोस्ट खात्याने नोव्हेंबर 2016 मध्ये तडकाफडकी निलंबित केले होते. तसचे नियुक्ती झालेल्या उमेदवारांची नियुक्ती रद्द केली होती. त्याविरोधात सदर कर्मचार्‍यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान संबंधीत कर्मचार्‍यांना आठ आठवड्यात नियुक्ती देण्याचे आदेश दिले आहेत.

पोस्ट खात्याने 24 जानेवारी 2015 रोजी पोस्टमन मेलगार्ड आणि एमटीएस पदासाठी जाहीरात दिली होती. त्यानुसार नियुक्त केलेल्या 395 उमेदवारांना प्रशिक्षण देऊन कामावर रुजू केले होते. तर इतर उमेदवार नियुक्तीची वाट पाहत असतानाच अचानक चिफ पोस्टमास्तर जनरल, मुंबई यांनी 25 नोव्हेंबर 2016 रोजी आदेश जारी करून संपुर्ण परिक्षा व त्याचा निकाल रद्द करून पोस्ट खात्याच्या संकेत स्थळावर प्रकट केला. या आदेशामुळे उमेदवारांना तडकाफडकी निलंबीत केले. तसेच निवड यादी ही रद्द केली. सदर परीक्षा नव्याने घेण्याचे जाहीर केले. सदर आदेशाविरोधात निवड यादीतील 143 उमेदवारांनी अ‍ॅड. स्वप्नील तावशीकर यांच्या मार्फत उच्च न्यायालयात एकूण चार याचिका दाखल केल्या. तसेच नियुक्त उमेदवारांपैकी दोन उमेदवारांनी अ‍ॅड. मजहर जहागीरदार आणि अ‍ॅड. फरहान पटेल यांच्या मार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्या. आर. एम. बोर्डे आणि ए. एन. ढवळे यांच्या खडपीठाने याचिकाकर्त्यांची याचिका मंजूर करून सर्व उमेदवारांना आठ आठवड्याच्या आत नियुक्ती देण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे सर्व उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.