बदनामीप्रकरणी महापौर काळजेंना कोर्टात खेचणार!

0

पुणे : आपल्याबद्दल बदनामीकारक शब्द जाहीररीत्या वापरून, जनमाणसात आपली प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल शुक्रवारी माहिती अधिकार कार्यकर्ते मृणाल ढोले-पाटील यांनी पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांना कायदेशीर नोटीस बजावली. याबाबत माहिती देताना ढोले-पाटील म्हणाले, 5 ऑगस्टला काळजे यांनी एक क्लिप प्रसिद्ध केली, त्यामध्ये त्यांनी आपल्याबद्दल मोठा ब्लॅकमेलर आणि सगळ्यांकडून पैसे उकळतो असे आरोप केले होते. या आरोपांचे खंडण दुसर्‍याच दिवशी पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेऊन केले होते. हा सगळा प्रकार म्हणजे चोराचा उलट्याबोंबा असा आहे. अवैधरित्या मिळविलेल्या जात प्रमाणपत्राविषयी मी उच्च न्यायालयात बर्‍याच लोकांना खेचले आहे, आणि पुढेही खेचणार आहे, असेही ढोले-पाटील यांनी सांगितले.

काळजेंना कुणी पैसे मागितले? ब्लॅकमेल केले?
ढोले-पाटील म्हणाले, मी नितीन काळजे वा इतर कोणत्याही अर्जदारास कधीही सार्वजनिक किंवा खासगीत भेटलो नाही व संपर्कदेखील केला नाही. महापौर हे शहराचे प्रथम नागरिक आहेत, त्यांनी असे बिनबुडाचे आरोप करू नयेत, सत्य असल्यास ते सिद्ध करावेत. त्यांना कोणी व कधी संपर्क केला? किती पैसे मागितले? कुठल्या फोनवरून फोन केले? आपण या संदर्भात पोलिसमध्ये तक्रार केली होती का? अशा बर्‍याच प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यावी, अशी अपेक्षाही ढोले-पाटील यांनी व्यक्त केली. आपली लढाई व्यक्तिगत किंवा व्यक्तीविरुद्ध नाही तर प्रवृत्तीविरुद्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या सर्व प्रकाराबाबत वारंवार आपण मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना, राजकीय पदाधिकार्‍यांना, सरकारी अधिकार्‍यांना पत्र लिहून, अथवा समक्ष भेटून, समस्या सांगून, समाजासाठी न्यायाची मागणी केली आहे, सगळे सांगतात की आम्ही ओबीसीच्या बाजूने आहोत, मग हे करतयं कोण? ही तिकिटे वाटली कुणी? पद देतयं कोण? पक्षाला याबाबत काहीच कसे माहीत नाही?, कोणी लक्ष द्यायला तयार नाही, त्यामुळे सगळे या कटात सामील आहेत की काय, असे राहून राहून वाटते. सगळेच दुर्लक्ष करीत असतील तर न्याय मागायचा कुठे? असा सवालही ढोले-पाटील यांनी केला.

बिनशर्त माफी मागा, राजीनामा द्या!
सत्ताधारी पक्ष सत्तेत इतका मदमस्त झाला आहे की, त्याला आपल्या पक्षाची समाजात होत असलेली बदनामी आणि निंदानालस्तीही दिसत नाही. या प्रकरणाला वाचा फोडल्याबद्दल विविध समाजातून अभिनंदनाचे आणि कौतुकाचे फोन येतात, विशेषतः कुणबी समाजाचा संघटनेचे फोन आले. एवढेच काय ते मनोबल वाढवणारे आहे. शेवटी, महापौर नितीन काळजे यांनी बिनशर्त माफी मागावी व राजीनामा द्यावा ही अपेक्षा व्यक्त करतो; आणि जर नोटिसीला समाधानकारक उत्तर नाही दिले तर आपण मानहानी दाव्याची तयारी केली आहे, असे ही ढोले-पाटील यांनी सांगितले.