बदलत्या विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे पेट्रोलचे दर घटणार

0

नवी दिल्ली । पेट्रोलचे दर कायमच भारतीयांच्या चिंतेचा विषय असतात. पेट्रोलचे दर वाढल्यास त्याची झळ सर्वसामान्यांच्या खिशाला बसते. दुचाकी किंवा चार चाकी गाडी असो वा नसो, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा फटका सामान्य जनतेला बसतो. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडते. मात्र, आता पेट्रोलच्या दरात कमालीची घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील बदलांमुळे 5 वर्षांनंतर पेट्रोलचे दर प्रति लिटर 30 रुपये असू शकतात, असे भाकित अमेरिकन भविष्यवेत्त्याने वर्तवले आहे. मात्र अद्याप या भाकिताला पेट्रोलियम खात्याकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. अमेरिकेचे प्रख्यात भविष्यवेत्ते टोनी सीबा यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील येत्या काळातील बदल लक्षात घेऊन 5 वर्षांमध्ये पेट्रोलचे दर मोठ्या प्रमाणात घसरतील, असा दावा केला आहे.

टोनी सीबा सिलिकॉन व्हॅलीतील एक मोठे व्यावसायिक
जगात सौरऊर्जेचा बोलबाला होईल, अशी भविष्यवाणी टोनी सीबा यांनी खूप आधीच केली होती. सीबा यांनी ज्यावेळी ही भविष्यवाणी केली, त्यावेळी सौरऊर्जेचे दर आताच्या दरांच्या तुलनेत 10 पट जास्त होते. टोनी सीबा यांची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली आणि सौरऊर्जेच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. आता जगभरात सौरऊर्जा पेट्रोलियम पदार्थांसाठी एक चांगला पर्याय ठरते आहे. टोनी सीबा सिलिकॉन व्हॅलीतील एक मोठे व्यावसायिक आहेत. यासोबतच सीबा स्टॅनफोर्ड महाविद्यालयात अपारंपारिक ऊर्जेशी संबंधित विषयांचा अभ्यास करतात. स्वयंचलित वाहनांमुळे जगभरातील पेट्रोलियम पदार्थांच्या दरांमध्ये जबरदस्त घट होईल. त्यामुळे तेलाचे दर 25 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरतील, असे टोनी सीबा यांनी म्हटले आहे. तसेच पेट्रोलचे दर 30 रुपये किंवा त्यापेक्षाही खाली आल्यास भारतीयांना मोठा आनंद होईल.

आकडेवारीतील तथ्य
टोनी सीबा यांच्या भविष्यवाणीवर विश्‍वास ठेवणे कदाचित भारतीयांना कठीण जाईल. मात्र सीबा यांनी दिलेले तर्क आणि त्यांच्याकडे असणारी आकडेवारी यांच्यात तथ्य आहे. 2020-21 मध्ये जगभरात तेलाची मागणी सर्वाधिक असेल. त्यामुळे तेलाचे दर 100 मिलियन प्रति बॅरलवर पोहोचतील. मात्र त्यानंतर तेलाचे दर घसरण्यास सुरुवात होईल. 10 वर्षांमध्ये तेलाच्या मागणीत घट होईल. त्यामुळे तेलाचे दर 70 मिलियन प्रति बॅरलवर येतील. म्हणजेच जगभरात 25 डॉलर प्रति बॅरल दराने तेल उपलब्ध असेल, असे सीबा यांनी सांगितले आहे.