बदल्यांनी ढवळले चाकण पोलीस दल; पंधराजणांच्या झाल्या प्रशासकीय बदल्या

0

चाकण पोलिसांचे मनुष्यबळ सुमारे नव्वदपर्यंत जाणार

चाकण : चाकणचे पोलीस दल बदल्यांनी ढवळून निघाले असून पोलीस निरीक्षकंसह एक सहायक पोलीस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक आणि अकरा पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांचे आदेश पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी काढले आहेत. येथील पोलीस दलात बदल्यांसाठी मागील दोन महिन्यांपासून हालचाली सुरु होत्या. एकाच पोलीस ठाण्यात सहा वर्ष झालेल्या कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. चाकण मधील एकूण 11 पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या असल्या तरी पोलीस अधीक्षकांनी चाकणसाठी एकूण तीस पोलीस कर्मचारी दिले असल्याने चाकण पोलिसांचे मनुष्यबळ तब्बल वीस ने वाढणार असून चाकण पोलिसांचे मनुष्यबळ सुमारे नव्वदपर्यंत जाणार आहे.

विविध पोलीस ठाण्यांमध्ये बदल्या
चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांची रांजणगाव येथे बदली झाली. चाकणला वरिष्ठ पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांची नेमणूक झाली असून त्यांनी कार्यभार स्वीकारला आहे. कर्तव्यदक्ष म्हणून लौकिक असलेले चाकण मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांची घोडेगाव येथे बदली झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रीधर जगताप यांची कोल्हापूर येथे तर उपनिरीक्षक अर्चना दयाळ यांची सातारा येथे बदली झाली आहे. याशिवाय सहायक पोलीस उपनिरीक्षक मुश्ताक शेख, राजेंद्र चौधरी, पोलीस हवालदार सुभाष पवार, सुनील साळुंके, राजेंद्र हिले, सुरेश दिघे, अनिल जगताप, आबा सूळ, संदीप रसाळ , महिला पोलीस कर्मचारी पुष्पलता जाधव, प्रमिला हारदे आदींच्या सहा वर्षे एकाच पोलीस ठाण्यात पूर्ण झाल्याने जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये प्रशासकीय बदल्या झाल्या आहेत.

अपुर्‍या बळाचा विषय ऐरणीवर
चाकण मधील गुन्हेगारीचा उंचावता आलेख पाहिल्यास अपुर्‍या पोलीस बळाचा विषय सातत्याने ऐरणीवर आला होता. त्याच पार्श्‍वभूमीवर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी चाकणसाठी अधिकच्या तीस पोलिसांची नेमणूक केली आहे. दोन सहाय्यक निरीक्षक, दोन उपनिरीक्षक आणि महिला पोलीस अधिकारी असे चाकण पोलिसांचे संख्याबळ वाढणार आहे. चाकण मधील पोलीस अधिकारी व अकरा पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्यानंतर अनेकांनी येथील पदभार सोडला आहे. तर चाकण पोलीस ठाण्यात नेमणूक झालेले नऊ पोलीस हजर झाले असून नव्याने नेमणुका झालेले उर्वरित पोलीस कर्मचारी लवकरच चाकण पोलीस ठाण्यात हजर होणार आहेत.