‘बधाई हो’ची घोडदौड सुरुच; १०० कोटींचा पल्ला पार

0

मुंबई : जंगली पिक्चर्स निर्मिती असलेला आणि आयुषमान खुराना, सान्या मल्होत्रा, नीना गुप्ता, गजराज राव यांच्या अभिनयानं साकारलेला ‘बधाई हो’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करताना दिसतोय. ‘बधाई हो’ने तिसऱ्या आठवड्यातही घसघशीत कमाईची घोडदौड सुरुच ठेवत तब्बल १०० कोटींची कमाई केली आहे. तसेच पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर सर्वात जास्त कमाई करणाऱ्या २०१८ सालातल्या चित्रपटांच्या यादीमध्येही ‘बधाई हो’ चा समावेश झाला आहे.

देशातच नव्हे तर परदेशात ही बॉक्स ऑफिसवर ‘बधाई हो’ने धुमाकूळ घातला आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाई ६६.१० कोटी इतकी होती. नंतर सलग दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाने कमाई कायम ठेवत २८.१५ कोटींचा पल्ला गाठला होता आणि आता तिसऱ्या आठवड्यात तर ‘बधाई हो’ने १००.१० कोटींपेक्षाही जास्त कमाई केली आहे. आयुषमानच्या या चित्रपटाला चाहत्यांचाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

‘बधाई हो’ चित्रपटाची कहानी रंजक असल्याने प्रेक्षक या जास्तीची पसंती देत आहेत. या चित्रपटातल्या चोवीस वर्षांच्या नायकाच्या आईला दिवस जातात. या गोष्टीची चर्चा घरचे लोक, नातेवाईक, मित्र, शेजारी या सगळ्यांमध्ये होऊ लागते. या चर्चेला ते कसे सामोरे जातात त्याची या सिनेमात वेगळ्या पद्धतीनं धमाल मांडणी केल्याचं दिसून येतंय.