बनावट आदेशाचे प्रकरण भोवले : भुसावळातील लिपिक श्याम तिवारी निलंबीत

भुसावळ : भुसावळ तहसीलदारांच्या बनावट आदेशाद्वारे प्लॉट विक्री प्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी तथा भुसावळ तहसील कार्यालयातील लिपिक शाम तिवारी यांना जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निलंबित केल्याने भ्रष्टाचार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली आहे तर अटकेतील नायब तहसीलदार शशिकांत इंगळे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव वरीष्ठांकडे पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बनावट आदेश प्रकरणी दाखल आहे गुन्हा
भुसावळातील जनकल्याण अर्बन पतसंस्थेचे प्लॉट विशेष वसुली अधिकारी रवींद्र धांडे यांनी भुसावळ तहसीलदारांचा बनावट आदेश वापरून परस्पर विक्री केले होते. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे. याच प्रकरणात नायब तहसीलदार शशिकांत इंगळे व लिपिक श्याम तिवारी यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांची सध्या कारागृहात रवानगी असतानाच तिवारी यांच्या निलंबनाचे आदेश जळगाव जिल्हाधिकार्‍यांनी काढले आहेत तर इंगळे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला आहे.

11 बनावट आदेशामुळे बडे मासे अडकणार जाळ्यात
तहसीलदारांच्या आदेशाचे 11 बनावट दाखले समोर आल्यानंतर या प्रकरणाची पोलिस बारकाईने चौकशी करीत आहेत. या प्रकरणात शहरातील भुमाफियासह बडे मासे अडकणार असल्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली. आतापर्यंत तीन मंडळाधिकारी व तीन तलाठ्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.