पुणे – बनावट आधारकार्ड बनवून दिल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी एका प्रोव्हिजन स्टोअर चालवणार्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या ताब्यातून 17 हजाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. भवरलाल सेवाराम चौधरी (45, रा. आंबेडकर वसाहत, औंध) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी पोलीस नाईक सारस साळवी यांना औंध येथील आंबेडकर चौकातील भौरवनाथ प्रोव्हिजन स्टोअर्स येथे बनावट आधारकार्ड बनवून दिले अशी माहिती मिळाली होती.
त्यानूसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी छापा मारून कारवाई करण्याचे आदेश दिले. सापळा रचलेल्या पथकाने छापा टाकला त्यावेळी दुकानातील एका बॉक्समध्ये काही आधारकार्ड व स्मार्ट कार्ड आढळून आली. दुकानातून एक मॉनीटर, सीपीयु, कलर प्रिंटर, स्कॅनर आदी 17 हजारांचा ऐवज सापडला. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संदेश केंजळे करत आहेत.