जळगाव : जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पैसे घेवून स्वॅब न घेता बनावट आरटीपीसीआर रीपोर्ट देणार्या दोघांपैकी एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. राजेंद्र विठ्ठल दुर्गे (रा.जळके, विटनेर, ता.जि.जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरेापीला बुधवारी न्यायालयात हजर केल्यानंतर 12 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
दोघांविरोधात दाखल आहे गुन्हा
प्रसारमाध्यमांमध्ये जिल्हा सामान्य रूग्णालयात बोगस आरटीपीसीआर अहवाल मिळतात याबाबत माहिती प्रसिद्ध झाली होती व त्यानंतर चौकशी समितीने 38 जणांचे जवाब नोंदवत अहवाल सादर केला होता. य प्रकरणी वैद्यकीय अधिक्षक डॉ.विजय गायकवाड यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी राजेंद्र विठ्ठल दुर्गे (रा.जळके, विटनेर, ता.जळगाव) आणि डाटा एंट्री ऑपरेटर स्वप्निल पांडूरंग पाटील (रा.जळगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील संशयित आरोपी राजेंद्र विठ्ठल दुर्गे याला अटक करण्यात आली. जिल्हा न्यायालयाचे न्यायमुर्ती व्ही.व्ही.मुगलीकर यांच्या न्यायालयात आरोपीला बुधवारी हजर केल्यानंतर त्यास 12 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहे.