बनावट ओळखपत्र बनवून परस्पर प्लॉटची विक्री

0

चाळीसगाव : खर्‍या मालकांचे बनावट ओळखपत्र तयार करुन तालुक्यातील टाकळी प्र.चा. येथील प्लॉट तोतया महिला व इसमाने विक्री केल्याचे 7 डिसेंबर रोजी चक्क सहा. दुय्य्म निबंधक कार्यालयात उघडकीस आले. याप्रकरणी साहाय्यक निबंधक यांच्या फिर्यादीवरुन तोतया जोडप्यासह ओळख देणार्‍या दोघांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहा. निबंधकांनी दिली फिर्याद
सुधीर खंडेराव निकम यांच्या मालकीचा टाकळी प्र.चा. (ता. चाळीसगाव) येथे प्लॉट आहे. तो प्लॉट निकम व त्यांच्या पत्नी अनिता यांच्या नावाने बनावट ओळखपत्र तयार करुन त्यांचे नावे 7 एप्रिल 2016 रोजी रेल्वे स्टेशन जवळील सहा. दुय्यम निबंधक कार्यालय येथे चाळीसगाव येथील रंगनाथ नाना मांडोळे यांना नोंदणी दस्त क्र. 1063/16 प्रमाणे विक्री केल्याचे समोर आले आहे. प्लॉट विक्री करताना सोमनाथ श्रावण पांचाळ व सुरेश राजु नाईक यांनी ओळख दिली असून सदर व्यवहार बनावट ओळखपत्रांच्या आधारे झाला व मुळ प्लॉट मालक आणि शासनाची दिशाभुल व फसवणूक केल्याची फिर्याद साहाय्यक निबंधक रामदास साहेबराव पाटील चाळीसगाव यांनी दिल्यावरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला तोतया व बनावट नावाने प्लॉट विक्री करणार चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पूढील तपास सपोनि इंगळे करीत आहेत. दरम्यान, महिला व एका इसमाचा यात समावेश असल्याचेही समोर आले आहे.

ओळखपत्र बनवून देणारी टोळी सक्रीय?
चाळीसगाव शहरात बनावट ओळखपत्र तयार करून फसवणुक करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून बनवट ओळख पत्र बनवुन देणारी टोळी चाळीसगाव येथे सक्रीय तर नाही ना ? असा सवाल उपस्थित होत आहे. खरेदी विक्रीचा व्यवहार होत असताना संबंधित विभागाचे अधिकारी कोणत्या कागदपत्रांची पाहणी करतात ? हा प्रकार त्यांच्या लक्षात येत नसेल का ? याची चौकशी होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे स्टॅन्प वेंडर कोणती कागदपत्रे तपासुन दस्त लिहीतात त्यांचे व अधिकारी. कर्मचारी यांचे संबंध आहेत का ? याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे. ओळख देणारे कोण आहेत त्यांचे ओळखपत्र खरे आहे की खोटे याची पडताळणी होते का ? जर होत असेल तर असे प्रकार का घडतात याची वरिष्ठ पातळीवरुन चौकशी होणे गरजेचे आहे.

चौकशीची मागणी
काही महिन्यापूर्वी अशाच प्रकारे बनावट नावाने चाळीसगावात धुळे रोडवर बँक लुटीतील आरोपींनी बनावट ओळखपत्र वापरुन लाखो रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचे उघडकीस आले होते. तसा चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा देखील दाखल आहे. त्यावेळी संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात वर्षभरात झालेल्या खरेदी विक्री व्यवहारांच्या चौकशीची मागणी केली होती.