भुसावळ पालिकेचा भूखंडही लाटला ; एरंडोलच्या संस्थेच्या नावावर शहरात उघडली शाळा
भुसावळ- बनावट कागदपत्रे सादर करून शैक्षणिक संस्थेची स्थापना केल्याप्रकरणी भुसावळसह जळगावातील चौघा आरोपींविरुद्ध बाजारपेठ पोलिसात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी एरंडोल येथील संस्थेच्या नावाचा वापर करून बनावट कागदपत्रे सादर करून भुसावळ पालिकेसह संचालकांची फसवणूक केली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कमदेखील लाटल्याने पोलिसांनी या गुन्ह्याच्या चौकशीला वेग दिला आहे.
एकाच संस्थेच्या नावाचा दोन ठिकाणी वापर
एरंडोल येथे बज्मे फरोगे उर्दू अदब या नावाची शैक्षणिक संस्था असून धर्मदाय आयुक्तांकडे तिची नोंदणीदेखील आहे मात्र असे असताना संशयीत चौघा आरोपींनी भुसावळातील संचालक असलेल्या फिर्यादी व साक्षीदारांचा विश्वास संपादन केला. शैक्षणिक संस्था स्थापन करीत असल्याचे भासवत बनावट कागदपत्रांच्या आधारे वरील नावाची संस्था स्थापन केल्याचे भासवले तसेच शैक्षणिक संस्थेसाठी भुसावळ शहरातील मोहम्मद नगर भागातील सर्वे नंबर 53/1/2/+2/2 वरील भूखंडही मिळवला. हाजी रजा हुसेन शाळेसह भुसावळ पालिकेत फसवणुकीची घटना घडली.
संचालकांच्या तक्रारीनंतर चौघांविरुद्ध गुन्हा
या प्रकरणी डॉ.एजाज अहमद खान (62, खडका रोड, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी मोहम्मद ईस्माईल शेख उस्मान (भुसावळ), मोहम्मद शकिल शेख उस्मान, शेख इकबाल शेख उस्मान, शाकिर अब्दुल अहमद कादीर (तिन्ही रा.जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज ठाकरे करीत आहेत. दरम्यान, तक्रारदाराने सहाय्यक संचालक, सरकारी अभियोक्ता यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता व त्यांच्या परवानगीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.
बनावट कागदपत्रे दिल्याचे उघड
पोलिसांनी या गुन्ह्याप्रकरणी भुसावळ पालिकेसह जळगावच्या शैक्षणिक विभागाला दिलेली कागदपत्रे पडताळून पाहिली असता ती बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याचे सूत्रांनी सांगितले.