बनावट कागदपत्रांद्वारे प्लॉटची परस्पर विक्री : एका संशयीताला अटक

भुसावळ/जळगाव : बनावट कागदपत्रे तयार करून प्लॉटची परस्पर विक्री केल्या प्रकरणात जगन रामचंद नारखेडे या आरोपीला अटक करण्यात आली. मेहरुणमधील प्लॉटची विक्री करण्यासाठी बनावट आधार, पॅनकार्डचा वापर करून दुसर्‍या व्यक्तीला उभे करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगन रामचंद नारखेडे (42, रा.भालेगाव, ता.मलकापूर, जि.बुलडाणा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

परस्पर केली प्लॉटची विक्री
सुरेश मांगीलाल बाफना (रा.सुयोग कॉलनी) यांच्या मालकीचा जळगाव शहर महापालिका हद्दीत मेहरूणमधील शेत सर्व्हे क्रमांक 163/1 ‘ब’ मधील बखळ प्लॉट क्रमांक 17 असून त्याची किंमत 35 लाख रुपये आहे. हा प्लॉट इम्रान मुख्तार तांबोळी (रा.प्लॉट क्रमांक 45, इंद्रप्रस्थनगर, एमआयडीसी, जळगाव) याने खरेदी केलेला आहे. त्याबाबत दुय्यम निबंधक जळगाव- 1 यांच्याकडे तसा दस्त क्रमांक 756/2021 नुसार खरेदीखत नोंदवून प्लॉट खरेदी केला आहे. बाफना याच्या प्लॉटवर त्याचे नाव लावलेले आहे. खरेदीखत करताना अरुणा दिलीप चौधरी (52, रा. एलआयसी कॉलनी) व फारुख शेख रहेमदुल्ला खाटीक (47, रा. मास्टर कॉलनी) यांनी हजर राहून खरेदी लिहून घेणार व लिहून देणार यांना ओळखतात, अशी खोटी माहिती सांगून त्यांनी सर्वांनी संगनमताने बाफना यांच्या नावाचे आधारकार्ड व पॅनकार्ड बनावट तयार केले. ते खरे असल्याचे भासवून त्या कागदपत्रानुसार बाफना यांच्या प्लॉटची खरेदी करून फसवणूक केली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अरुणा चौधरी यांना अटक करण्यात आलेली आहे. त्या सद्य:स्थितीत कारागृहात आहेत.