बनावट कागदपत्रांद्वारे स्टेट बँकेला दोन कोटी 80 लाखांचा गंडा

3 Crore fraud to State Bank in Bhusawal: Case against 26 borrowers including two bank managers भुसावळ : ऐपत नसताना बनावट कागदपत्र तयार करून येथील आनंदनगर भागातील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतून दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोन कोटी 79 लाख 300 रुपयांचे गृह कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी दोन बँक मॅनेजर, व्हॅल्यूअरसह 26 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वीदेखील अशाच पद्धत्तीने बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल असतानाही बँक मॅनेजर यांच्या कार्यपद्धत्तीविरोधातच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर बनावट कागदपत्र तयार करून कर्ज घेणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
शहरातील आनंदनगर भागात असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतून बनावट कागदपत्र तयार करून 22 मार्च 2018 ते 16 जून 2019 या काळात बँकेतून 1 कोटी 40 लाख 1हजार रुपयाचे गृह कर्ज घेण्यात आले. घेतलेले गृह कर्ज घरासाठी उपयोगात न आणता अन्य ठिकाणीच त्याचा उपयोग केला. याबाबत बँकेचे तत्कालीन मॅनेजर विशाल इंगळे, व्हॅल्यूवर एसएम शिंदे यांच्याशी संगनमत करुन कर्ज घेतले होते. याप्रकरणी 13 जणांविरुद्ध सोमवारी सायंकाळी बाजारपेठ पोलीस ठाण्यात महेश देविदास तायडे, प्रतिभा गोपाळ सोनवणे, हबीब शाह गंभीरशाह, जितेंद्र गंगाधर पाटील, सुलताना बी अहमद कुरेशी, फरजान बी महेमुद खान पठाण, गणेश किसन तेली, वैशाली किसन तेली, शोएब रजा शेख साजिद, हसीना बी अब्बास शहा, नदीम खान सुलतान खान, बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक विशाल इंगळे, व्हॅल्यूवर एस एम शिंदे यांच्याविरुद्ध बँक मॅनेजर मनोज बेलेकर (रा. भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसर्‍या गुन्ह्यात एक कोटी 37 लाखांची फसवणूक
याच शाखेमधून दुसर्‍या एका प्रकरणांमध्ये गृह कर्जाच्या नावाखाली बँकेचे मॅनेजर नंदलाल पाटील,व्हँल्युअर अशोक एम दहाड, एस एम शिंदे, समीर बेले यांच्यासह गफार अली मोहम्मद अली, तोफिक खान मुसाखान, तोफिक खान मेहमूद खान, रईसाबी गंभीर शाह, निलोफर बी तोफिक खान, कौसर खान यासीन खान, यास्मिन बी अजीज खान, तनवीर फत्तु तडवी, पुनम भीमराव जाधव यांच्यासह 13 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

बँक व्हॅल्यूअरही आरोपी
या प्रकरणात सुद्धा बँक व्यवस्थापक व्हॅल्यूअर यांच्याशी आपसात संगणमत करून बँकेची फसवणूक करण्याचा उद्देशाने त्यांनी आयटीआय व्हॅल्युएशन रिपोर्ट व बनावट दस्ताऐवज तयार करुन बँकेस फसविले. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हरीष भोये पुढील तपास करीत आहे. या प्रकरणामुळे बँकिंग क्षेत्रात आणि कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.