बनावट कागदपत्राद्वारे धर्मांतर करून साऊथ आफ्रिकेत जाणाऱ्या युवकाला अटक

0

लातूर- लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे धर्म परिवर्तन करून व खोट्या माहितीच्या पासपोर्ट व इतर कागदपत्रे मिळवणाऱ्या एका व्यक्तीला दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे. नरसिंग जयराम भुयकर उर्फ महमद रेहान इबनेआदम (वय ३०) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नरसिंग उर्फ महमद रेहान हा दक्षिण आफ्रिकेत धार्मिक कार्यक्रमास जाण्याच्या तयारीत होता, असे सांगण्यात येते.

भुयकर उर्फ इबनेआदम हा मुळचा कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील झहिराबादचा रहिवासी आहे. तो उदगीर येथे एका बेकरीत काम करत होता. त्याने आधारकार्ड, पॅनकार्ड, आई-वडिलांचे बनावट पॅनकार्ड बनवून पासपोर्ट काढला. तसेच आई-वडिलांचे काल्पनिक नाव, शैक्षणिक पात्रता व कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता याबाबतही खोट्या माहितीच्या आधारे एचडीएफसी बँकेत खाते उघडले होते.

दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव यांच्या फिर्यादीवरून नरसिंग जयराम उर्फ मोहम्मद रेहान इबनेआदम याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.