पुणे । तंबाखू खाणार्यांनो आता सावधान बाजारात बनावट दारू, सिगारेट बरोबरच बनावट तंबाखू बनवून त्याची विक्री करणार्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. तंबाखू कंपनीने हडपसर पोलिसांच्या मदतीने हे रॅकेट उघडकीस आणले. या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 1 लाख 78 हजार रुपयांची 400 बनावट तंबाखूची पाकिटे जप्त केली आहे.
गायछापच्या नावाने विक्री
दुकानात तंबाखू विक्री करणारा आरोपी नीलेश याकडे तपास केला असता, इम्रान सय्यद हा बनावट तंबाखू पाकीट बनवून आमच्याकडे विक्रीसाठी देत असे अशी माहिती त्याने दिली. चौकशी दरम्यान बनावट तंबाखू वापरून गाय छाप पुड्या बनवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
20 पोती बनावट तंबाखू सापडली
याप्रकरणी तंबाखू विक्री करणारा नीलेश रणपिसे व बनावट तंबाखू पुड्या बनवणार इम्रान सय्यद या दोन आरोपींना अटक केली आहे. राजेश सोमाणी यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. मांजरी फार्म येथील तुळजाभवानी सुपर मार्केट या दुकानामध्ये गायछाप या कंपनीची बनावट तंबाखूची विक्री होत असल्याची माहिती फिर्यादीस समजली होती. याबाबत त्यांनी हडपसर पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी पुणे-सोलापूर रोडवर असलेल्या मांजरी ग्रीन इमारती मधील तुळजाभवानी सुपर मार्केट या दुकानावर छापा टाकला. यामध्ये 20 पोती बनावट गाय छाप तंबाखू पोलिसांना सापडली.