भुसावळ– बनावट दस्तावेज बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघा लिपिकांविरुद्ध फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आमोदे ग्रामपंचायतीचे लिपिक राजेंद्र अशोक पाटील यांनी 1 मार्च 2010 ते डिसेंबर 2012 दरम्यान लिपिक म्हणून कार्यरत असताना व प्रत्यक्षात दहा महिनेच सेवा दिली असताना 2000 च्या जुन्या प्रोसेडींग रजिस्टरमध्ये 8 नोव्हेंबर 2000 मध्ये आपली नेमणूक झाली असल्याचे उल्लेख करीत ठरावात फेरफार केली तसेच 9/14 वर खोटा ठराव करून बनावट दस्तावेज तयार करण्यात आले. या दस्तावेजांचा आधार घेत आरोपीने ग्रामपंचायत कर्मचारी सेवाज्येष्ठता यादीत नाव समाविष्टसाठी प्रस्तावही दिला. जिल्हा परीषदेचे कनिष्ठ लिपिक उल्हास वसंतराव कुलकर्णी यांच्याशी संगनमत करून यावल गटविकास अधिकार्यांच्या नावे प्रस्ताव तयार करून जिल्हा परीषदेत कुठलीही नोंद न करता ज्येष्ठता यादी अनुक्रमांक 327 मध्ये नाव समाविष्ट करून घेतले. सेवाज्येष्ठता रीक्तपदाचा दहा टक्के आरक्षणाचा लाभ घेत 3 डिसेंबर 2012 पासून भुसावळ तालुक्यातील हतनूर येथे कंत्राटी ग्रामसेवक म्हणून नोकरीही केली. शासनाची फसवणूक केल्याचे उघडकीस आल्याने राजेंद्र पाटील व उल्हास कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.