शिरपूरजवळील आमोदे शिवारात कारवाई ; युपीतील क्लीनर जाळ्यात, चालक पसार
शिरपूर- मुंबई-आग्रा महामार्गाजवळील आमोदे शिवारात बनावट दारू बनवण्यासाठी लागणार्या स्पिरीटाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून थाळनेर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत 30 हजार लीटर स्पिरीटासह टँकर व अन्य साहित्य मिळून 43 लाख 54 हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई 2 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास करण्यात आल्याने स्पिरीट तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवाईत स्पिरीटाच्या टँकरवरील क्लीनरला अटक करण्यात आली असून चालक पसार झाला आहे तर स्पिरीट खरेदी करणारी शिरपूरातील चौकडी पोलिसांच्या रडारवर आहे.
गोपनीय माहितीवरून पोलिसांची कारवाई
मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरपूर फाट्यावरील रोज पॅलेसमागे स्पिरीटाची बनावट दारू बनवण्यासाठी तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती शिरपूर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत यांच्यासह थाळनेर पोलिसांना मिळाल्यानंतर बुधवारी रात्री पोलिसांनी सापळा रचला. रात्री 11 वाजेच्या सुमारास टँकर (पी.बी.11सी.एम.2302) या टँकरमधून हिरव्या रंगाच्या पाईपाद्वारे स्पिरीट काढून ते महेंद्रा पीकअप (एम.एच.15 एफ.व्ही.2399) मधील रीकाम्या ड्रममध्ये तसेच अन्य रीकाम्या ड्रममध्ये भरताना आढळल्याने पोलिसांना अचानक छापा टाकताच चार ते पाच संशयीत अंधाराचा फायदा घेत पसार झाले मात्र टँकरचा क्लीनर राजनाथ राजदेव यादव (31, धनछुआ, ता.बदलापूर, जि.जौनपूर, उत्तरप्रदेश) याला पकडण्यात यश आले तर त्याचा साथीदार चालक सुभाष शिवराम यादव (म.स.231, सरायपडरी, महाराजगंज, ता.बदलापूर, जि.जौनपूर, उत्तप्रदेश) हा पसार होण्यात यशस्वी झाला. आरोपी राजनाथ यादवच्या चौकशीत टँकरमधील स्पिरीट शिरपूर येथील योगेश राजपूत, विजय बागले व त्याचे तीन ते चार साथीदार घेणार असल्याची कबुली त्याने दिल्यावरून संशयीतांचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे.
44 लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी घटनास्थळावरून 30 हजार लिटरचा स्पीरीटचा टँकर (पी.बी.11सी.एम.2302), महेंद्रा पीकअप (एम.एच.15 एफ.व्ही.2399), 11 स्पिरीट भरलेले ड्रम, टँकरमधून स्पिरीट काढण्यासाठी वापरण्यात येणारा पाईप असे एकूण 43 लाख 54 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. थाळनेर पोलिसात हवालदार लादुराम चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत, थाळनेरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद पाटील, हवालदार लादूराम चौधरी, रवींद्र पवार, बापूजी पाटील, प्रवीण गोसावी, आर.एस.रोकडे, शिरसाठ, राहुल बैसाणे, दीपक पाटील, मंगेश मंगळे आदींच्या पथकाने केली.