बनावट दारू प्रकरणी दादा वाणी जेरबंद

0

धुळे । बनावट दारुच्या धंद्यातील ‘दादा’ मानल्या जाणार्‍या दादा वाणीला पोलिसांनी जेरबंद केले असले तरी या धंद्यात नव्याने काही दादा निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. शिरपूर तालुक्यात पोलिसांनी छापा टाकून बनावट दारुचा कारखाना उध्वस्त केला आहे. बनावट दारुसह साडेतीन लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी चौघांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शिरपूर तालुक्यातील वासर्डी गावात राहणार्‍या मगन सुकदेव पाटील यांच्या नवीन शेतात बांधकाम करण्यात आले आहे. या बांधकामाच्या तळमजल्यात बनावट दारु तयार करण्याचा उद्योग केला जात असल्याची माहिती शिरपूर शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी खातरजमा करुन रात्री 8 वाजेच्या सुमारास बनावट दारुच्या कारखान्यावर छापा टाकला. छापा पडत असल्याची कुणकुण लागताच नारायण अशोक पाटील आणि त्याचे तीन साथीदार फरार झाले. पोलिसांना या कारखान्यामध्ये टँगोपंच, देशीदारु आणि 2 हजार लिटर स्पिरीट, बाटली सील करण्याचे मशीन, 4 हजार बाटल्या आढळून आल्या. जप्त केलेल्या मालाची किंमत 3 लाख 49 हजार 756 रुपये आहे. याप्रकरणी पो.कॉ.प्रशांत बागले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउनि एच.डी.पाटील करीत आहेत.