चाळीसगाव येथे बनावट देशी दारु तयार करण्याच्या कारखान्यावर एलसीबीची धाड
साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त
चाळीसगाव – स्पिरीट हे घातक रसायन टाकुन बनावट देशी दारु तयार करणार्या कारखान्यावर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल दिनांक 5 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास शहरातील कोदगाव रोडवरील पिर मुसाकादरी बाबा दर्गा मागील भागात छापा मारुन तब्बल 3 लाख 41856 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असुन 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या कारवाईने अवैध व्यावसायीकांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पिर मुसा कादरी बाबा दर्गा मागे कोदगाव रोडवर एका शेडमध्ये बनावट टँगो पंच बनावट दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती जळगाव स्थानीक गुन्हे शाखेला मिळाल्यावरुन पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे व स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रामकृष्ण पाटील, अनिल देशमुख, महेश पाटील, दर्शन ढाकणे व विनोद पाटील या पथकाने दिनांक 5 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास धाड टाकुन 2 लाख 2 हजार 176 रूपये किमतीची बनावट देशी टँगो पंच दारूच्या 31 बॉक्स, 19 हजार 600 रूपयांच्या रिकाम्या बाटल्या, 32 बॉक्स, 85 हजार रूपये किमतीचे दारू तयार करण्याचे स्पिरीट रसायन, 25 हजार रूपये किमतीचे बनावट दारू सिलबंद करण्याचे मशिन व 10 हजार रूपये किमतीची इतर साधने असा 3 लाख 41 हजार 856 रूपयांचा मुदेमाल जप्त केला.
चौघांविरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी एलसीबीचे पोलीस नाईक रामकृष्ण पाटील यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला आरोपी दिपक वामन राजपुत रा.पाटील वाडा चाळीसगाव, प्रदीप रामकृष्ण तायडे रा.पवार वाडी चाळीसगाव, मनोज सदाशिव मांडगे चाळीसगाव, विलास मेटकर चाळीसगाव या चौघांविरूध्द बनावट दारू तयार करून मानसाच्या जीवीतास धोका निर्माण होईल असे काम केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एलसीबी सहाय्यक फौजदार रविंद्र बागुल करीत आहेत.