लालगोट्याच्या दोघांविरुद्ध गुन्हा ; एकास अटक दुसरा पसार
मुक्ताईनगर- बनावट नागमणीचा शो दाखवून दिल्लीच्या व्यापार्याला ठगवणार्या लालगोट्याच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल असून एका आरोपीस मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली येथील बिरकईन ट्रेडिंगचे व्यापारी युद्धवीरसिंग धीरजलालसिंग यांना 27 फेब्रुवारी रोजी लालगोटा येथील जोगींदर राजावती भोसले व दयाल जोगींदर भोसले यांनी गंडवले होते. आरोपींनी तक्रारदाराला लालगोटा येथील घरी नेत बंद घरात नागमणीचा प्रयोग दाखवून सुलेमानी पत्थर, बनावट नागमणी, नकली शंख देत दोन लाखांची मागणी केल्यानंतर तक्रारदाराने मुक्ताईनगर येथील एटीएममधून एक लाख 25 हजार रुपये दिले मात्र होते दिल्लीत गेल्यावर संशयीतानी दिलेल्या वस्तू बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींवर कारवाई करण्यासाठी तक्रारदार 12 मार्च रोजी सकाळी मुक्ताईनगरात आल्यानंतर त्यांनी निरीक्षक सुरेश शिंदे यांची भेट घेत कैफियत सांगताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी दयाल जोगींदर भोसले याच्या मुसक्या आवळल्या तर दुसरा आरोपी पसार झाला आहे. तपास उपनिरीक्षक नीलेश सोळंके करत आहेत.