जळगाव । शिक्षण सेवक म्हणून नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्र देत एकाची 12 लाखात फसवणूक केली होती. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील एकाने न्यायाधीश आर.जे.कटारिया यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असता तो फेटाळून लावण्यात आला आहे. तसेच संशयितार्फे हा दुसर्या अर्ज दाखल करण्यात आला होता. तो देखील फेटाळला आहे.
पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील रहिवासी अंकूश मोरसिंग चव्हाण (वय-32) यांना अर्जूंन तुकाराम पवार (रा.पिंपळगाव हरेश्वर) व बळीराम हेमराज चव्हाण (रा.वरसाडे तांडा) या दोघांनी शिक्षण सेवक म्हणून नौकरीला लावून देण्याचे आमिष दाखवले. यानंतर 12 लाख रुपये घेवून अंकूश चव्हाण यांना बनावट नौकरीचे पत्र दिले होते. यानंतर अंकूश चव्हाण यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 6 सप्टेंबर 2016 रोजी दोघांविरूध्द पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी संशयित अर्जूंन तुकाराम पवार याने न्यायाधीश आर.जे. कटारिया यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर कामकाज होवून न्या. कटारिया यांनी संशयित अर्जुंन पवार याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. यातच संशयिताचा हा दुसर्यांदा अटकपूर्व जामीन अर्ज होता. तो देखील फेटाळला आहे. यापूर्वी देखील अटकपूर्व न्यायालयाने फेटाळून लावला होता.