बनावट नोटा छापणारे रॅकेट उघड!

0

जळगाव। पाचोरा शहरातील जळगाव रस्त्यावर असलेल्या त्र्यंबकनगरात सुरू असलेला बनावट नोटांचा छापखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री छापा असून पथकाने पाच जणांना अटक केली आहे. मात्र, सहावा संशयित फरार होण्यास यशस्वी झाला आहे. तर पथकाने बनावट नोटा छापण्याचे साहित्य ताब्यात घेतले आहे. यातच संशयितांकडून 92 हजार रुपयांच्या नकली नोटा पोलिसांनी मिळून आल्याअसून त्या देखील जप्त करण्यात आले. दरम्यान, संशयित हे पाचशेच्या नोटा छापण्याच्या तयारीत होते. परंतू स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा छापखान्यावर छापा मारत संपूर्ण उध्दवस्त केल्याने त्यांचा तो प्लॅनही पोलिसांनी आणून पाडला आहे.

असा रचला सापळा अन् घेतले ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलिस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांना किरण साहेबराव पाटील हा भडगाव बसस्टॉपवर नकली नोटा घेवून भुसावळ येथे नकली नोटांची डिलेव्हरी देण्यासाठी जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलिस अधीक्षक बच्चनिंसंह यांच्या मार्गदर्शनाखाली चंदेल यांनी त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. टी.धारबळे, सफौ. नुरूद्दीन शेख, विनोद पाटील, विजय पाटील, विलास पाटील, संयज सपकाळे, रवी पाटील, दिलीप येवले, अशोक चौधरी, सतिष हाळनोर, रविंद्र पाटील, नरेंद्र वारूळे, रामकृष्ण पाटील, दत्तु बडगुजर, दर्शन ढाकणे, बापु पाटील आदींच्या पथकाला तपासासाठी भुसावळ येथे पाठविले. मात्र, भडगावनंतर किरण हा पाचोरा आला आणि त्यानंतर भुसावळ न जाता तो पुन्हा भडगाव गेल्याची माहिती पथकाला मिळताच पथकाने भुसावळ येथून रवाना होत भडगाव गाठले आणि किरण साहेबराव पाटील (वय-26, रा. विवेकानंद कॉलनी. भडगाव) याला ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने किरणची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ पाच हजार रुपयांच्या शंभराच्या नकली नोटा मिळून आल्या. यानंतर पथकाने त्याला खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला आणि गेल्या दिड महिन्यांपासून साथीदारांच्या मदतीने नकली नोटा पाचोरा येथे छापल्या असल्याची कबुली देत त्याने त्याच्या साक्षीदारांची नावे देखील सांगितले.

यानंतर पथकाने मंगळवारी रातो-रात किरण याचे साथीदार विशाल पितांबर साळवे (वय-26, रा. जनता वसातह, पाचोरा), पवन राजेंद्र चौधरी (वय-19, रा. श्रीरामनगर, पाचोरा), दुर्योधन बाबुराव खैरनार (वय-23, हनुमान नगर), ज्ञानेश्‍वर रघुनाथ पाटील (वय-20, रा. बहिरमनगर, पाचोरा) यानाही ताब्यात घेतले. तर सहावा साथीदार सिध्दार्थ भिमराव मोरे (रा. जनता वसाहत, पाचोरा) याचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. परंतू तो पथकाला मिळून आला नाही. यानंतर पाचही संशयितांना ताब्यात घेवून पथकाने मध्यरात्री जळगाव गाठले.

92 हजारांच्या नकली नोटा जप्त
स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पाचही संशयितांकडून 92 हजार रुपयांच्या नकली नोटा व साहित्य जप्त केले आहे. त्यात किरण याच्या कडून लॅपटॉप तर पवन याच्या घरून एक कॅम्प्युटर व स्कॅनर तसेच दोन कलर प्रिंटर जप्त केले आहे. हेच नव्हे तर विशाल याच्या घरातून 28 हजार 700 रुपयांच्या 100 दराच्या नकली नोटा व ज्ञानेश्‍वर यांच्याकडून 37 हजार 100 रुपयांच्या नकली नोटा तसेच कोरे बॉन्ड पेपर, कात्री, 100 दराच्या 270 अर्धवट छापलेल्या नोटा असे एकूण 92 हजार रुपयांच्या नकली नोटा पथकाने ताब्यात घेतले आहे.

भामट्यांची पाचशेच्या नोटा छापण्याची तयारी
100 रुपयांच्या नकली नोटा छापण्याल्यानंतर भामटे आता 500 रुपयांच्या बनावट नोटा छापण्याच्या तयारीत होते. त्यासाठी त्यांनी फॉरमॅटही तयार केलेले होते. मात्र, त्यापूर्वीच हे भामटे पोलिसांच्या हाती लागले. यांंच्याकडून 92 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखा पथकाला किरण याने गेल्या दिड महिन्यांपासून पाचोरा, भडगाव येथे नकली नोटा छापत असल्याची माहिती दिली.

पाच लाख द्या अन् पंधरा लाख घेऊन जा…
भडगाव, पाचोरा तालुक्यात या भामट्यांनी गेल्या दिड महिन्यांपासून बनावट नोटांचा धंदा जोरात सुरू केला होता. त्यात ते समोरील पार्टीकडून खरे पाच लाख रुपये घ्यायचे आणि पंधरा लाख रुपयांच्या नकली नोटा समोरच्या पार्टीला डिलेव्हरी द्यायचे, असा त्यांनी त्यांचा गोरख धंदा सुरू केला होता. मंगळवारी देखील किरण हा भुसावळ येथे नकली नोटांची डिलेव्हरी देण्यासाठी येत होता. परंतू त्या अगोदरच पथकाने त्याला पकडले.

भामटा किरण उच्च शिक्षीत
स्थानिक गुन्हे शाखा पथकाने ताब्यात घेतलेला किरण साहेबराव पाटील हा उच्च शिक्षीत असून त्याचे एमए.बी.एड, तसेच बी.पी.एड तसेच सॉफ्टवेअर टॅक्नॉलॉजीचा डिप्लॉमा झालेला असून तो भडगाव येथील गिरड हायस्कुल या विना अनुदानित शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर त्याची पत्नी देखील उच्च शिक्षीत आहे. तसेच विशाल साळवे हा कमी शिक्षीत असून तो कलर काम करतो. तर दुर्योधन खैरनार याचे 10 वीपर्यंतचे शिक्षण घेतले असून तो मजूरी काम करायचा व ज्ञानेश्‍वरही मजुरी काम करतो. तर पवर हा 9 वीपर्यंत शिक्षीत आहे. परंतू कॉम्प्युटर चांगलेच हाताळता येत असल्याने तो एका मेडीकलवर कामाला आहे. तर फरार सिध्दार्थ हा देखील पेंटर आहे. त्यानंतर ते ह्या नकली नोटांच्या धंद्याकडे वळले.

पैशांमुळे दोघांमध्ये वाद
पैशांच्या डिलेव्हरी दिल्यानंतर मिळाणार्‍या हिश्यातुन पैसे मिळत नसल्याने ज्ञानेश्‍वर पाटील व सिध्दार्थ मोरे यांच्यामध्ये वाद झाला होता. या वादात ज्ञानेश्‍वर याने लॅपटॉप आणि पिंटर घेवून निघून गेला होता. त्यानंतर ते प्रिंटर व लॅपटॉप विशाल याच्या घरी ठेवले होते. हिश्यातील पैसे द्यावे तरच लॅपटॉप आणि प्रिंंटर मिळेल असा दमही त्याने सिध्दार्थ दिला होता. ही संपूर्ण माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या चौकशीत समोर आली.

दोन्ही गुन्हेगार…
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील राजेंद्र काशिनाथ कानडे यांचे अपहरण केल्याप्रकरणी दुर्यौधन खैरनार यांच्याविरूध्द पाचोरा पोलिस ठाण्यात 2015 मध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर फरार आरोपी सिध्दार्थ मोरे हा देखील गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द पाचोरा पोलिस ठाण्यात 2013 मध्ये नकली नोटा बाळगल्याबाबतचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, पथकाने पाचही भामट्यांना ताब्यात घेतले असून त्याला पुढील कारवाईसाठी भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

रंगकामातून झाली ओळख
भामटा किरण साहेबराव पाटील यांच्या घराचे रंगकाम हे सिंध्दार्थ मोरे याला दिले असल्याने तो किरणच्या घरी रंगकामाला येते होतो. त्यातच दोघांची हळु-हळु ओळख झाली. ओळखी नंतर सिध्दार्थच्या कल्पनेतून तसेच किरणच्या सॉफ्टफेटरच्या ज्ञानातून दोघांनी नकली नोटा छापण्याची कल्पना सुचली. सिध्दार्थ याने यापूर्वीही नकली नोटा छापल्या असल्याने त्याला त्याचा ज्ञान होते. त्यानंतर दोघांनी इतर साथीदारांच्या मदतीने 100 रुपयांच्या नकली नोटा छापण्याचा धंदा सुरू केला.