पुणे । 100 रुपयांच्या 50 हजार किमतीच्या बनावट नोटा छापून त्या साथीदारामार्फत चलनामध्ये वटविण्याचा प्रयत्न करणार्या कोल्हापूरच्या आयटी इंजिनियरला पकडण्यात आले. तो एका नामांकित कंपनीत 50 हजारांच्या पगारावर नोकरीस आहे. याप्रकरणी आणखी एकाला दरोडा प्रतिबंधक पथकाने ताब्यात घेतले.उदय प्रताप वर्धन (34 रा. लोहगाव) असे या इंजिनीअरचे नाव असून त्याचा साथीदार संदीप वसंत नाफडे (34, व्यवसाय टेलरिंग, रा. साठे वस्ती) या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांकडून एकूण 1 लाख 1 हजार 620 रुपयांचे बनावट नोटा बनविण्याची साहित्य जप्त करण्यात आले. दोघांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात कलम 459(अ) (क) (ड), 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरोडा प्रतिबंधक पथकातील पोलीस कर्मचारी थोरात यांना टिंगरेनगर येथे चलनातील बनावट नोटा बाळगून तो लोकांना देत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन खात्री केली असता एक इसम कलवड वस्ती येथील डीसीबी बँकेच्या एटीएम बाहेर उभा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी सापळा रचून त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे 50 हजार किमतीच्या 500 नोटा आढळून आल्या. या नोटा बनावट असल्याचे त्याने कबूल करून त्याचा साथीदार उदय या नोटांची छपाई करीत असून नाफडे हा त्या चलनात वटविणार होता. वर्धन यांच्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्या घरात लॅपटॉप, प्रिंटर आणि प्रिंटरच्या बाजूला 100 रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. वर्धन यांच्याकडून 100 च्या 45 बनावट नोटा, 35 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, 12 हजार रुपयांचा प्रिंटर, कात्री, ए 4 आकाराचे 200 कागद असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.