चाळीसगाव । बनावट मजुरांमार्फत खोटे कागदपत्र तयार करुन तालुक्यातील पिंपरखेड येथे सन 2015-16मध्ये ठेकेदाराने गाळ काढण्याच्या कामात भ्रष्टाचार करुन 15,600 रुपये काढले असल्याचा आरोप पिंपरखेड येथील सरपंच व सदस्यांनी लेखी तक्रारीद्वारे ग्रामीण पोलीस निरीक्षकांकडे केला असून चौकशीची मागणी केली आहे. सदर काम झालेले नसतांना बनावट बिले काढून शासनाची फसवणूक करणार्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सरपंच सिध्दार्थ मोरे सदस्य वसंत सुर्यवंशी, उदय अहिरे, वंदना पाटील, शोभा संसारे, रेखा मोरे यांनी केले.
रोहयोचे काम जेसीबीच्या सहाय्याने केले
सन 2015-16 मध्ये आयडब्ल्युएमपी या योजनेतंर्गत पिंपरखड ग्रामपंचायत हद्दीत नाला खोलीकरण व गाळ काढण्याचे काम 9 मे 2015 ते 11 मे 2015 या कालावधी करण्यात आले. यासाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक चाळीसगाव, मंडळ कृषी अधिकारी चाळीसगाव यांनी पाहणी करुन कामास मजुरी दिली होती. 5 लाख 87 हजार 707 रुपये एवढे अंदाजित रक्कमेचे गाळ व नाला खोलीकरणाचे काम होते. यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी पाचोरा यांनी तांत्रिक मंजुरी देवून हे काम जेसीबीच्या सहाय्याने करण्यात येवून त्या निधीचा विनीयोग देखील झाला. 14 मे 2017 ते 22 जून 2017 या दरम्यान महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पिंपरखेड बंधार्यातील गाळ काढण्यात आला असल्याचे दाखविण्यात आले व हे काम ग्रामपंचायतमार्फत करण्यात आल्याचे दर्शविण्यात आले. जि.प. लघुसिंचन शाखा अभियंतत्याकडून काम मंजुरी मिळून गटविकास अधिकारी यांनी पाहण्याचे देखील नमुद करण्यात आले. सदर कामाचे रक्कम मंजुर होऊन मंजुरांना वाटून दिल्याचे दिसत आहे.
नातेवाईकांच्या नावे खोटी बिले
सदर काम शाखा अभियंता व बिडीओ यांनी दाखविलेली बिले खोटी असून 14 मे 2017 ते 20 मे 2017 या कालावधीत पिंपरखेड बंधार्यातील काम झालेच नाही. तसेच फिर्यादी यांनी काम केले नसून त्यांना तशी माहिती दिली नाही संबंधितांनी ग्रामपंचायत सदस्या दोन महिला व मुजाईद हुसेन यांच्याशी संगनमत करुन त्यांच्या नातेवाईकांच्या नावे खोटी बिले काढली सदर काम संस्था अथवा मजुरामार्फत करण्यात आले नाही. ज्या मुजरांच्या नावे बिले काढली त्यांनी तेथे काम केले नसल्याचे म्हटले आहे.