जळगाव | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना. नितीन गडकरी यांच्या खोट्या व बनावट स्वाक्षर्या करून त्यांच्या नावाचे लायसन्स तयार करून शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द रामानंद नगर पोलिसात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव आरटीओ कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना. नितीन गडकरी यांचे बनावट लायसन्स तयार करण्यात आले आहे. या लायसन्सवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे बनावट शिक्के तयार करून वापरण्यात आले आहे. या दोन्ही लायसन्सवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना. नितीन गडकरी यांच्या खोटया व बनावट स्वाक्षर्या देखील करण्यात आल्या आहे. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस व ना गडकरी यांच्या नावाने बनावट व खोटे दस्तऐवज तयार करून ते खरे असल्याचे भासवून शासनाची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार ३१ जुलै रोजी उघडकीस आला होता. याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी राकेश मोतीलाल शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुध्द गुरन १४२/२०१८ भादवी कलम १७०, ४६५, ४७१, ४७४, ४७३,४७६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून पीएसआय भागवत पाटील करीत आहे.