भुसावळ- शहरातील श्री संतोषी माता मर्चंण्टस को ऑप.क्रेडीट सोसायटी लि.चे चेअरमन वासुदेव आनंदा इंगळे यांच्यासह पतसंस्थेचे वसुली अधिकारी प्रशांत लक्ष्मण भारंबे (निवृत्ती नगर, वृंदावन पार्क, भुसावळ) यांना जळगाव आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी सहाय्यक निबंधकांची बनावट स्वाक्षरी करून 101 चा दाखला बनवल्याप्रकरणी अटक केली होती. अटकेनंतर आरोपींना न्यायालयाने 9 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती तर ही कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने आरोपींना 22 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या दरम्यान, आरोपींनी जामिनासाठी अर्ज केल्यानंतर त्यावर 12 रोजी न्या.डी.एम.शिंदे यांच्या न्यायासनापुढे सुनावली झाली असता न्यायालयाने जामीन फेटाळला. आरोपींविरुद्ध दाखल झालेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा व आर्थिक बाबीशी निगडीत असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले.
वासुदेव इंगळेंच्या अडचणीत वाढ
तक्रारदार रवींद्र नारायण भोळे (शांती नगर, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात फिर्याद दिली होती. त्यांच्या पत्नी संगीता भोळे यांनी संबंधित पतसंस्थेतून कर्ज घेतले होते मात्र कर्ज वसुलीसाठी कुठलीही नोटीस न देता पतसंस्थेचे चेअरमन वासुदेव इंगळे, त्यांचे संचालक मंडळ, वसुली अधिकारी प्रशांत भारंबे व तत्कालीन सहाय्यक निबंधक गिरीधर फुलाजी अहिरे आदींनी सहकारी संस्थेच्या सहाय्यक निबंधक कार्यालयातून संगनमत करून गुन्हेगारी कट रचत स्वःहस्ताक्षरात 101 चा खोटा दाखला बनवला तसेच त्यावर गोल व आडवा शिक्का मारत तक्रारदाराचा शांती नगरातील बंगला जप्त केला होता तर चौकशी केल्यानंतर 101 चा दाखला बनावट बनवला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी तक्रार दिल्यानंतर सोमवार, 5 नोव्हेंबर रोजी तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात झाला होता. वासुदेव इंगळे यांच्यासह प्रशांत भारंबे यांना अटक करण्यात आल्यानंतर आधी पोलिस कोठडीत व नंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. सोमवार, 12 रोजी आरोपींच्या जामिनावर कामकाज झाले. आरोपीतर्फे अॅड.जगदीश कापडे तर सरकार पक्षातर्फे अॅड.नवाब अहमद यांनी बाजू मांडली.