मुंबई :- पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या तीन वर्षातील कामगिरीच्या कार्य अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयातील परिषद सभागृहात झाले. यावेळी वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, जलसंपदामंत्री गिरीष महाजन उपस्थित होते.
लोणीकर यांनी मागील तीन वर्षात राज्यासह जालना व परभणी जिल्ह्यात केलेल्या विविध विकासकामांचा लेखाजोखा अहवाल पुस्तिकेच्या माध्यमातून मांडला आहे. यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ३१ मार्च २०१८ ला राज्य हागणदारीमुक्त घोषित केले. पाणीपुरवठ्याच्या माध्यमातून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत राज्यातील साडेचार हजार अपूर्ण योजना पूर्ण केल्या आहेत. जालना व परभणी जिल्ह्यात विस्तारित समाधान योजना, लोअर दुधना व निम्न दुधना प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग, नदी पुनरूज्जीवन, रेशीम संकलन केंद्र, ऊर्जा, जलयुक्त शिवार यामध्ये भरीव काम झाल्याचा दाखला या कार्य अहवाल पुस्तिकेच्या माध्यमातून देण्यात आला आहे.