बर्सिलोना । ऍथलेटिक बिलबाओचे माजी प्रशिक्षक इनस्टो व्हेलवेर्डे यांची बर्सिलोना फुटबॉल क्लबच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. व्हेलवेर्डे आणि बार्सिलोना क्लब यांच्यात दोन वर्षांचा करार झाला आहे. बर्सिलोना संघाने अलिकडेच ला लीगा फुटबॉल स्पधेंतील उपविजेतेपद मिळविले होते.
बार्सिलोना संघाचे यापूर्वीचे फुटबॉल प्रशिक्षक लुईस एन्रीक यांच्या जागी व्हेलवेर्डे यांची अधिकृत नियुक्ती केल्याची घोषणा गुरूवारी करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर हॉलंडच्या व्हेलवेर्डे यांनी प्रशिक्षक क्षेत्रात प्रवेश केला. व्हेलवेर्डे यांचा फुटबॉल क्षेत्रातील अनुभव बर्सिलोनाला आगामी महत्त्वाच्या स्पर्धामध्ये अधिक उपयुक्त ठरेल, अशी आशा बार्सिलोना क्लबचे अध्यक्ष जोसेफ बार्टमोयु यांनी व्यक्त केली. व्हेलवेर्डे 1988 आणि 1990 या कालावधीत जोहान क्रूफ यांच्या नेतृत्वाखाली बार्सिलोना संघात आघाडीच्या फळीतील खेळाडू होते. 53 वर्षीय व्हेलवेर्डे यांनी प्रशिक्षक कारकीर्दीला ऍथलेटिक बिलबाओ क्लबकडून प्रारंभ केला. त्यानंतर ते बॅसेक्वी क्लबचे दीर्घकाल प्रशिक्षक होते. सहा वर्षांच्या कालावधीत त्यांनी प्रशिक्षकपद भूषविले.