बर्‍हाणपूरसह दुईचे शिकारी जाळ्यात ; बंदुकीसह काडतुस जप्त

1

डोलारखेडा वनहद्दीत वनविभाग व पोलिसांची संयुक्त कारवाई ; एक शिकारी पसार

मुक्ताईनगर- शिकारीच्या उद्देशाने आलेल्या बर्‍हाणपूरसह दुईच्या चौघा शिकार्‍यांना पोलिस व वनविभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत डोलारखेडा वनहद्दीत अटक केल्याची घटना 13 रोजी रात्री करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून एका बंदुकीसह पाच जिवंत काडतुस, चाकू जप्त करण्यात आला. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना दोन दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
पट्टेदार वाघांचा अधिवास असलेल्या वढोदा वन परीक्षेत्रातील डोलारखेडा वनहद्दीत रविवारी रात्री शिकारी आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने मुक्ताईनगर पोलिसांची मदत घेत सापळा रचला तर आरोपी मोहम्मद ताहीर नईमुल्ला अन्सारी, अब्दुलखाँ रहेमानखा, मोहम्मद रफीक अब्दुल सर्व (रा.बर्‍हाणपूर) व प्रताप अंकात कोचुरे (रा. दुई ता. मुक्ताईनगर) यांना अटक करण्यात आली तर एक शिकारी पसार होण्यात यशस्वी झाला. आरोपींच्या ताब्यातून लांब नळीची बंदूक, 12 एमएमचे पाच जिवंत काडतूस, बॅटरी, चाकू जप्त करण्यात आला. वनविभागाचे उपवन संरक्षक डी.डब्लु.पगार, गस्ती पथकाचे आरएफओ डिगंबर पवार, वढोद्याचे आरएफओ अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली 20 जणांच्या पथकाने सापळा रचून शिकारींच्या मुसक्या आवळल्या. वनरक्षक रहिम तडवी यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.