बलात्कार पीडिताच्या पुनर्वसनासाठी 10 लाखांची मदत

0

मुंबई  । राज्य शासनाच्या मनोधैर्य योजनेतून बलात्कार पीडित महिला व मुलींना पुनर्वसनासाठी राज्य सरकारकडून 10 लाखांची आर्थिक मदत देऊ, असे आश्‍वासन महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेवर बोलताना दिले.

राज्य शासनाच्या मनोधैर्य योजनेतून बलात्कार पीडित मुली व महिलांना शासनाकडून 3 लाख आर्थिक मदत दिली जात आहे. ही मदत तुटपुंजी आहे. गोवा सरकारकडून 10 लाखांची मदत केली जात आहे. ती मदत वाढवण्यात यावी त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने सुचित केले आहे. त्याविषयीची लक्षवेधी सूचना विधानपरिषदेत मांडली होती. यावर उत्तर देताना मुंडे म्हणाल्या की, मनोधैर्य योजनेतून अर्थसाहाय्याबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यात क्षति साहाय्य व पुर्नवसन मंडळ स्थापन करण्यात आलेले आहे. अर्थसाहाय्याची रक्कम अपुरी असल्याबाबत न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. त्यामुळे तातडीने निर्णय जाहीर करणे शक्य होणार नाही.

योजनेचा आलेख
2013 पासून मनोधैर्य योजना सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत 7,691 प्रकरणे समितीकडे दाखल झाली असून 1,424 प्रकरणे मागे घेण्यात आली आहेत. 274 प्रकरणे न्यायालयात प्रलंबीत आहेत. अर्थसहाय्यासाठी 5,993 प्रकरणे असून 4,318 प्रकरणांना अर्थसहाय्य देण्यात आले आहे.