नंदुरबार । अख्या जगाला अन्न पुरवठा करणारे, घाम गाळून शेतीमाल पिकविणारे बळीराजाला आंदोलन करावे लागते, यापेक्षा महाराष्ट्र राज्याचे दुर्दैव काय म्हणावे लागेल. शेतकर्यांच्या या प्रखर आंदोलनाला नंदुरबार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सक्रीय पाठींबा जाहिर करण्यात येत आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की अखंड हिंदुस्थानच्या इतिहासात तत्कालिन पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांनी जय जवान-जय किसान असा नारा दिला. कारण या देशाच्या संरक्षणासाठी लढणारे जवान आणि जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असलेला शेतकरी राजा तितकाच महत्त्वाचा आहे. परंतू सध्याच्या राज्य व केंद्र शासनाने ‘मर जवान-मर किसान’ अशी भूमिका घेतली आहे. असा आरोप मनसेतर्फे करण्यात येत आहे.
शेतकर्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही
राज्यात कर्जमाफीसाठी शेतकर्यांना रस्त्यावर उतरावे लागते. दुसरीकडे शासन नोकरदार वर्गाला ‘गलेलठ्ठ पगार’ देऊन खूश ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र शेतीत राबणार्या बळीराजाकडे दुर्लक्ष करुन त्याचे शोषण करीत आहे. अशा दुटप्पी धोरण असलेल्या शासनाचा मनसे तीव्र निषेध करीत आहे. नंदुरबारसह संपूर्ण राज्यात सुरु असलेल्या शेतकरी बांधवांच्या रास्त आणि योग्य मागण्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना सक्रीय पाठींबा जाहीर करीत आहे. भविष्यात प्रखर लढा देण्यासाठी मनसे शेतकर्यांच्या पाठीशी उभी राहील, असेही मनसेतर्ङ्गे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, शहराध्यक्ष ईश्वर ठाकूर, तालुकाध्यक्ष सुनिल कोकणी, राकेश माळी, पवन गवळे, प्रविण जोशी, सुमानसिंग राजपूत यांनी म्हटले आहे.