बळीराजा हिंसा थांबव

0

गेले 5 दिवस महाराष्ट्रात शेतकरी संपावर आहेत. सुरुवातीचे 2-3 दिवस शेतकर्‍यांनी संपाचे प्रदर्शन करताना निदर्शने, धरणे आंदोलन केले. आपल्याच शेतात उगवलेला शेतीमाल रस्त्यावर फेकून दिला. दुधाचे भरलेले टँकर रस्त्यावर ओतून दिले. जेवढे होईल तेवढे शेतकर्‍यांनी संप म्हणून स्वतःचे नुकसान केले. प्रसारमाध्यमांमधून संपाचे असे स्वरूप पाहून शहरातील पांढरपेशांनी शेतकर्‍यांवरच आसूड उगारायला प्रारंभ केला. संपाच्या नावाखाली शेतीमालाची ही नासाडी आहे, अशी टीका ते करू लागले. शेतकर्‍यांना समाजद्रोही ठरवू लागले. शेतकर्‍यांची ही मिजास आहे, असे बोल लावू लागले. अवघ्या सोशल मीडियातून हे पांढरपेशी शेतकर्‍यांवर टीका करू लागले.

या संपाच्या माध्यमातून खर्‍या अर्थाने महाराष्ट्राने ग्रामीण आणि शहरी मतभेद अनुभवले तसेच आजही भारत देश कृषिप्रधान आहे हेही सिद्ध झाले. कालपर्यंत बँक, वाहतूक, विमा आदी क्षेत्रांतील घटक संपावर जायचे. त्याचा परिणाम शहरी भागावर व्हायचा, पण शेतकर्‍यांच्या संपाने शहरातील नागरिकांना बिन दुधाचा काळा चहा प्यायला भाग पाडले. मुंबईकरांना रेल्वे रुळाच्या बाजूला गटाराच्या पाण्यात उगवलेली भाजी खायला भाग पाडले. नेहमीच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट किमतीत भाज्या खरेदी करणे भाग पाडले आणि दुसरीकडे शेतकरी दूध, भाज्या रस्त्यावर फेकून देतोय, हे पांढरपेशीयांना पचनी पडले नाही आणि त्यांनी शेतकर्‍यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. सरकारनेही शेतकर्‍यांची व्यथा समजून घेण्यापेक्षा त्यांच्या संपात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. याचा राग शेतकर्‍यांना अधिक आला. या सर्वाचा परिणाम म्हणून संपाच्या पाचव्या दिवशी आता शेतकरी हिंसक बनला. त्याने राज्यभर जाळपोळ सुरू केली आहे. शेतकर्‍यांनी हिंसक आंदोलन सुरू केले आहे. नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याची घटना घडली आहे. सोलापूरच्या सलगर गावातील शेतकर्‍यांनी सरकारच्या नावाने मुंडण केले आणि पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी निषेध केला. काल रात्री तळेगावचा टोकनाका फोडण्यात आला. पुणतांब्यात रेल्वे रोखून धरण्यात आली. कोल्हापूरच्या वडगावात आंदोलन तीव्र करत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची व्यापार्‍यांशी झटापट झाली. उस्मानाबादेत एसटी बसेस जाळण्याच्या घटना घडल्या. सांगलीच्या तासगावात रस्त्यावर टायर पेटवून देण्यात आले. त्यामुळे हा संप पाचव्या दिवशीही चर्चेत राहिला आहे. वरकरणी आंदोलनातील जाळपोळीच्या या घटना गंभीर वाटत नसल्या तरीही आंदोलन करताना अशाच घटनांची काळजी घ्यायची असते. कारण अशाच घटनांच्या आडून आंदोलनाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला जातो. मुळात शेतकरी हा सृजनतेचा पाईक आहे. मातीत दाणे रुजवून, मशागत करून तो पीक काढतो. मातीला फुलवतो. तिला सुजलाम् सुफलाम् करतो, असा शेतकरी जर जाळपोळ करणार असेल तर ते त्याच्या प्रतिमेला नक्कीच शोभा देणारे नाही. धरणीला माता मानणारा हा बळीराजा संताप व्यक्त करताना हिंसक होणार नाही, याची दक्षता आता खुद्द बळीराजानेच घ्यायला हवी. शेतकर्‍यांनी आपला आक्रोश नक्कीच सरकार दरबारी पोहोचवला पाहिजे. मात्र, तो अहिंसेच्या मार्गाने पोहोचला तर तो अधिक प्रभावी ठरेल. कोपापेक्षा संयम कायमच बेहतर असतो, ही गोष्टही शेतकरी आंदोलकांनी लक्षात घ्यायला हवी.

कालपर्यंत पुणतांब्यापर्यंत सीमित असणारे हे आंदोलन आता नाशिकच्या दिशेने सरकले आहे. हा संप शहरी नागरिकांना उपासमार घडवून आणणारा आहे. मुंबई वगळता राज्यभर शेतकर्‍यांनी दिलेली बंदची हाक यशस्वी ठरली आहे. मात्र, शेतकरी आणि सरकार यांच्यात अद्याप ठोस अशी कोणतीच चर्चा होत नाहीय. दुसरीकडे जखमी आंदोलनाला नव्याने उभारी देण्यासाठी सर्वच शेतकरी संंघटनांनी कंबर कसली आहे. शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी असलेली सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. ज्यात शेतकर्‍यांचे नेते मंडळी आहेत. यापुढे शेतकरी संपाबाबत जो काही निर्णय होईल तो याच सुकाणू समितीच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. खरंतर ही चांगली गोष्ट म्हणायला हवी. दुधाने तोंड पोळले की मग ताकही फुंकून प्यायले जाते, असे म्हणतात ते काही खोटे नाही. कारण यापुढे ही सुकाणू समितीच आता शेतकर्‍यांची भाग्यरेषा ठरवणार आहे.

एखाद्या विषयातून सहीसलामत बाहेर पाडण्यासाठी समिती स्थापन करणे हा मार्ग केव्हाही सोयीस्करच असतो. ही समिती शेवटी कर्जमाफी, योग्य हमीभाव हेच निर्णय घेणार आहे, जर समितीचे हे निर्णय सरकार मान्य करणार असेल तर समितीमधील सदस्य आज जी भूमिका मांडत आहेत ती मान्य करून शेतकर्‍यांचा प्रश्‍न मिटवून का टाकत नाही, हा प्रश्‍न समितीच्या घोंगाड्यामध्ये भिजत ठेवून वेळकाढूपणाचे धोरण सरकारने स्वीकारू नये?

शेतकर्‍यांनी आज महाराष्ट्र बंद यशस्वी करून दाखवला आहे. हे शेतकर्‍यांच्या एक जुटीचे दर्शन आहे. कष्टकरी, शेतकरी, कामगार हा घटक जेव्हा सत्ताधार्‍यांविरोधात एकवटतो तेव्हा सत्ताधार्‍यांचे आसन डळमळीत होते, याचा प्रत्यय फडणवीस सरकारला येईल, यात शंका नाही. मात्र, यश मिळेपर्यंत बळीराजाने संयम राखायला हवा. आंदोलनात बाहेरील शक्ती घुसून त्या आंदोलनाला हिंसक वळण तर देत नाहीत ना, यावरही बारीक लक्ष ठेवावे लागणार आहे. कारण रात्र वैर्‍याची तर आहेच पण काळही बेरकी आहे.