कामशेत : बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुढे जाणार्या ट्रेलरला धडकली. यामध्ये बसमधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास जुना पुणे-मुंबई महामार्गावर कामशेत गावाजवळ खिंडीत झाला. सकाळी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून राज्य परिवहन महामंडळाची कुर्ला ते पिंपळगावरोठा (एमएच 14 / बीटी 1893) ही बस मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जात होती. कामशेत गावाजवळ खिंडीत आल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस खिंडीतल्या चढावर पुढे जाणार्या ट्रेलरला (एमएच 43 / यु 8524) धडकली. बस क्लीनर बाजूने धडकल्याने बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींची नावे समजू शकली नाहीत. अपघातानंतर जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. कामशेत वाहतूक पोलीस हनुमंत माने, संतोष घोलप, गणेश गव्हाणे, समीर शेख, चितन बोंबले, सतीश ओव्हाळ, नितेश चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन वाहतूक कोंडी सुरळीत केली. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.