पुणे । अप्पर इंदिरानगरमध्ये काल ब्रेक फेल झालेल्या पीएमपीएमएल बसने 8 वाहनांना धडक दिली होती. यामध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. दरम्यान या घटनेतील अपघातग्रस्त बसचे दोन्ही ब्रेक सुस्थितीत होते, त्या बसचा हॅन्डब्रेकदेखील दाबला गेला नव्हता. त्यामुळे काल झालेला अपघात चालकाच्या चुकीमुळेच झाला असावा, अशी माहिती पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
सोमवारी झालेली दुर्घटना दुर्दैवी होती, असे सांगताना मुंढे म्हणाले की, तांत्रिक तपासणी केल्यानंतर बसचे ब्रेक सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले असून बसचा वेग जास्त असल्याने तसेच या ठिकाणी तीव्र उतार असल्यामुळे चालकाला ब्रेक लावणे शक्य झाले नाही. दरम्यान, जखमींना तूर्तास नुकसानभरपाई देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.