बसच्या धडकेने गोदावरी रुग्णालयातील नर्स गंभीर जखमी

Godavari hospital nurse seriously injured after being hit by a speeding bus in Sakegaon भुसावळ : गोदावरी रुग्णालयात नर्स म्हणून असलेल्या विवाहित महिला पतीसह रुग्णालयात दुचाकीने जात असताना साकेगाव बसस्थानकाजवळ समोरून येणार्‍या बसने उडवल्याने नर्स गंभीर जखमी झाली तर पतीसह अन्य शाळकरी विद्यार्थी जखमी झाला. हा अपघात रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडला.

विचित्र अपघातात तिघे जखमी
सूत्रांच्या माहितीनुसार, भुसावळातील विवाहिता व गोदावरी रुग्णालयातील नर्स दीपिका विजय वाघमारे (32, रा.कंडारी, पीओएच कॉलनी, भुसावळ) या पती विजय वाघमारेसह दुचाकी क्रमांक (एम.एच.19 सी.सी.3179) ने साकेगावकडून गोदावरी रुग्णालयात निघाल्या असताना समोरून येणार्‍या जळगाव-रावेर बस (क्रमांक एम.एच.20 बी.एल.0721) ने दुचाकीला जबर धडक दिल्याने वाघमारे या जखमी झाल्या. साकेगावातील रहिवासी व दहावीचा विद्यार्थी साद जहांगीर पटेल यासदेखील अपघातग्रस्त दुचाकीचा फटका बसल्याने तोदेखील काही वेळ बेशुद्ध झाला.

साकेगावकरांनी वेळीच दिला मदतीचा हात
अपघातानंतर बस चालकाने जागेवर बस न थांबवता रस्त्याच्या कडेला घेण्याच्या प्रयत्नात नर्स वाघमारे यांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. अपघातातील जखमींना अदनान पटेल, रमजान पटेल तसेच रीक्षा चालक सोपान पवार यांच्यासह ग्रामस्थांनी गोदावरीत हलवले. अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांच्यासह हवालदार वाल्मीक सोनवणे व सहकार्‍यांनी धाव घेतली.