पुणे । पीएमपी बसथांब्यांवर अतिक्रमण झाल्याने प्रवाशानांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ही अतिक्रमणे तातडीने काढण्याचे आदेश महापालिका अतिक्रमण विभागाने सर्व क्षेत्रिय कार्यालयांना दिले आहेत. पीएमपी प्रशासनाने या अतिक्रमणांची माहिती महापालिकेत पाठविली होती. तसेच कारवाई करण्याची विनंती महापौर मुक्ता टिळक यांच्यासह प्रशासनास करण्यात आली होती. त्यानुसार, अतिक्रमण विभागाने हे आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे.
शहरात पीएमपीचे शेकडो बस थांबे आहेत. पण, याचा आधार घेत या थांब्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पथारी व्यावसायिक, तसेच अनधिकृत विक्रेत्यांनी कब्जा केला आहे. त्यामुळे अनेकदा बसला थांब्यावर थांबता येत नाही. तसेच प्रवाशांनाही बस थांबा सोडून काही मीटर अलिकडे किंवा पलिकडे थांबावे लागते. परिणामी, बस थांब्याचे नियोजन चुकल्याने बस रस्त्यातच उभी राहते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याबरोबरच वाहतूक कोंडीचाही त्रास होतो. त्यामुळे अशा अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. याची गंभीर दखल घेत अतिक्रमण विभागाने सर्व क्षेत्रिय कार्यालयांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांनुसार, पीएमपी बस थांब्याच्या दोन्ही बाजूस 50 मीटर परिसरातील अतिक्रमणे काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच भविष्यात पुन्हा बस थांब्यावर अतिक्रमण होणार नाही, याची जबाबदारी संबधित अधिकार्यांवर सोपवली आहे.