बसमध्ये मुलींची छेड; दोन गटात हाणामारी

0

जळगाव – तालुक्यातील नशिराबाद येथून दररोज शेकडो विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी येत असतात. शाळा, कॉलेज सुटल्यानंतर बसने घरी जात असतांना बसमध्ये मुलींची छेड काढल्याच्या कारणावरुन वाद झाल्याने बसमधील दोन गटात जोरदार हाणामारी झाली. प्रवाशांनी वारंवार सांगून देखील हे विद्यार्थी ऐकत नसल्याने चालकाने बस थेट पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली. यावेळी पोलिसांनी मारहाण करणार्‍या विद्यार्थ्यांना तंबी देत त्यांना सोडून देण्यात आले.

नशिराबाद येथून दररोज शेकडो विद्यार्थी बसने प्रवास करीत शहरात शिक्षण घेण्यासाठी येत असतात. गेल्या काही दिवसांपासून प्रवास करणार्‍या नुतन मराठा महाविद्यालय व अँग्लो उर्दू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये बसमध्ये किरकोळ कारणांवरुन वाद होत आहे. दरम्यान आज शहरातील जूने बस स्थानकातून (एमएच २० डी ८७१८) क्रमांकाची बस दुपारी २ वाजेच्या सुमारास नशिराबादकडे जाण्यास निघाली. राष्ट्रीय महामार्गावर बसमधील काही विद्यार्थी जोरजोरात गाणी म्हणत बसमधील विद्यार्थीनींची छेड काढीत होते. गाणे गात असलेल्या विद्यार्थ्यांना बसच्या महिलावाहक कविता कोळी व चालक मनोहर सोनवणे यांच्यासह प्रवासी व काही विद्यार्थ्यांनी हटकले. मात्र तरी देखील विद्यार्थी टवाळखोरपणा करीत होते. याचवेळी विद्यार्थीनींची छेड काढण्याच्या कारणावरुन विद्यार्थ्यांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना आज दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर घडली. काही करुन देखील विद्यार्थी ऐकत नसल्याने चालक व वाहकाने बस थेट एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली. यावेळी हाणामारी करणार्‍या विद्यार्थ्यांना पोलिस स्टेशनमध्ये घेवून जात त्यांना तंबी देण्यात आली.

बसमधील वाद नित्याचेच
नशिराबाद येथून अपडाऊन करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये दररोज किरकोळ करणांवरुन भांडण होत असतात. अनेकदा या विद्याथ्यार्ंमध्ये हाणामारीच्या घटना देखील घडलेल्या आहे. दरम्यान आज धावत्या बसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. बस चालकाने चार वेळा बस थांबवत विद्यार्थ्यांना तंबी दिली. मात्र तरी देखील विद्यार्थी ऐकत नसल्याचे वाहक व चालकांकडून सांगण्यात आले. तसेच या मार्गावर महिला वाहक असल्याने विद्यार्थ्यांकडून त्यांची देखील छेडखानी केली जात असल्याची माहिती प्रवाशांसह महिला वाहकाने दिली.

विद्यार्थ्यांकडे सापडले लोखंडी फायटर
बसमध्ये विद्यार्थ्यांची हाणामारी झाल्याने बस पोलिस स्टेशनला आणली असता. पोलिसांनी टवाळखोर विद्यार्थ्यांना बसमधून उतरविले. यावेळी हाणामारी करणार्‍या काही विद्यार्थ्यांकडे लोखंडी फायटर मिळून आले.

विद्यार्थीनींमध्ये घबराहटीचे वातावरण
टवाळखोर विद्यार्थ्यांकडून विद्यार्थीनींचे दररोज मुलींचे छेडखानी केली जात असते. त्यामुळे अनेकवेळा वाद देखील झाले आहे. मात्र तरी सुद्धा विद्यार्थी ऐकत नसल्याने विद्यार्थींनीमध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच विद्यार्थ्यांमधील किरकोळ कारणांवरुन होणारे वाद हे नित्याचेच असल्याने प्रवासी देखील हतबल झाले आहे.

पोलिसांनी दिली तंबी
बसमध्ये हाणामारी करणार्‍या टवाळखोर विद्यार्थ्यांना पोलिसांनी पोलिस स्टेशनमध्ये घेवून गेले. यावेळी पोलिसांकडून विद्याथ्यार्ंना तंबी देण्यात आली आणि त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.