बसस्थानकावर ‘छत्रपती’चे अतिक्रमण

0

इंदापूर । भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखाना प्रशासनाने एसटी बस स्थानकावरच अतिक्रमण केल्याचे दिसून येते. कारखान्याने येथे थेट वाहनतळच उभारले असून ऊसाने भरलेले ट्रॅक्टर, ट्रक येथे पार्क केले जात आहेत. या जड वाहनांच्या गर्दीमुळे प्रवासी व शेकडो शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. राजकीय दबावापोटी अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याची चर्चा आहे.भवानीनगरमधून दररोज शेकडो विद्यार्थी, नागरीक एसटी बसने या मार्गावरून ये-जा करत असतात. भवानीनगर बसस्थानकात एसटी बसेसची नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. त्यामुळे हे बसस्थानक कायम प्रवाशांनी गजबजलेले असते. माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे वर्चस्व असलेला भवानीनगरचा छत्रपती सहकारी साखर कारखाना बारामतीपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे. बसस्थानकाच्या समोर रस्त्याच्या पलिकडे हा कारखाना आहे. बसस्थानकाच्या पुर्वेला कारखान्याचे जड वाहन ऊस वाहतूक पार्किंग तळ आहे.

एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष
अशा स्थितीतही प्रशासन अधिकारी मात्र कानावर हात व तोंडावर बोट ठेवून बघ्याची भुमिका पार पाडत आहेत. भविष्य काळात अपघाताच्या मोठ्या घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने कारखाना प्रशासनावर कायद्याचा बडगा उगारून वेळीच पार्किंग तळास बंदी घालणे गरजेचे आहे. राजकीय दबामुळे कायदेशीर कारवाई होईल की नाही याचे गमक सुटत नसल्याने तेथिल परिसरात भवानीनगर बस स्थानक सध्या चर्चेचा विषय बनले आहे. संबधित एसटी महामंडळ प्रशासन अधिकार्‍यांना ही गोष्ट माहीत आहे. परंतु हा कारखाना राष्ट्रवादीच्या एका वजनदार नेत्याच्या ताब्यात असल्याने त्याच्या राजकीय दबावापोटी कारवाई करण्यात हलगर्जीपणा केला जात असल्याची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे.

जड वाहतुकीची वर्दळ
कारखाना व बस स्थानकाच्यामधून इंदापूर बारामती राज्य मार्ग क्रमांक 66 जात असल्याने या मार्गावर नेहमीच प्रमाणापेक्षा जास्त जड वाहतुकीची वर्दळ असते. या रस्त्यालगत भवानीनगर बस स्थानक असल्याने बसस्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी कायमच होत असते. तर अनेक वेळा या परिसरात छोटे मोठे अपघातही घडले आहेत. हा परीसर कायमच धोकादायक स्थिती निर्माण करणारा आहे.

वाहतुकीला अडथळा
या दररोज गजबजलेल्या ठिकाणावर छत्रपती सह. साखर कारखान्याने दंडेलशाहीने अतिक्रमण केले आहे. बस स्थानकाच्या जागेत ऊस वाहतूक पार्कींग तळ बनविल्याने शेकडो विद्यार्थ्यांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. बस स्थानकाची जागा छत्रपती साखर कारखान्याने बळकावल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बस स्थानकाच्या आवारात बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून दररोज राजरोसपणे ट्रॅक्टर ट्राली व ट्रकसारखी अवजड ऊस भरलेली वाहने पार्किंग करून एसटी वाहतुकीला अडथळा निर्माण केला जात आहे.