पुणे :- गाडी चालवतांना मोबाईलवर बोलण्याने अपघाताची दाट शक्यता असते आणि अनेकांचे अपघातात बळी देखील गेले आहेत. यामुळे पीएमपी प्रशासनाने पीएमपीच्या बस चालविणाऱ्या 96 चालकांवर मोबाईलवर बोलत असल्याची दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून प्रत्येकी 1 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमिवर फोनवर बोलत पीएमपी बस चालविणाऱ्या चालकावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. तसेच मोबाइलवर बोलत बस चालवितानाचा पी एम पी चालकाचा फोटो पाठवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते.
वाहतुकीच्या नियमानुसार वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे धोकादायक असूनही त्यात पीएमपी बसचालक मोबाइलवर बोलत बस चालवताना दिसतात. त्यामुळे प्रशासनाकडून मोबाईलवर बोलणाऱ्या चालकांचे फोटो नागरिकांनी पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर सत्यता तपासून दोषी चालकांवर कारवाई करत त्यांच्याकडून 1 हजाराचा दंड वसूल करण्यात आला. तसेच संबंधित रक्कम माहिती पाठवणाऱ्या प्रवाशास बक्षीस म्हणून देण्यात आले.
जानेवारी 2014 ते फेब्रुवारी 2018 दरम्यानच्या कालखंडात शहरातील विविध रस्त्यांवरून बस चालविणारे बसचालक मोबाईलवर बोलत असल्याचे फोटो पीएमपीएमएल प्रशासनाकडे दाखल करण्यात आले होते. त्यानुसार प्रशासनाने संबंधित चालकाची ड्युटी, बस क्रमांक, फोटो तारीख, तिकीट अनुक्रमांक, वाहकाचा क्रमांक इत्यादीची तपासणी करून चालकांकडून प्रत्येकी एक हजाराचा दंड वसूल केला. दंडाची रक्कम फोटो काढणाऱ्या प्रवाशाला बक्षीस म्हणून देण्यात आली.