बस स्थानकावर महिलेची पोत लांबविण्याचा प्रयत्न

0

जळगाव । जळगाव-कुरंगी या एसटी बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेची पोत लांबविण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरूवारी दुपारी 1.15 वाजेच्या सुमारास जळगाव बसस्थानकावर घडली. यानंतर बस थेट प्रवाश्यांसह जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात आल्यानंतर या घटनेची चौकशी करण्यात आली. दरम्यान, पोत चोरीला गेली नसल्याने महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली नाही.

गर्दीचा फायदा घेत पोत लांबविण्याचा प्रयत्न
नांद्रा येथील रहिवासी अलका शरद पाटील (वय-37) ह्या गुरूवारी दुपारी जळगाव बसस्थानकावर आल्या होत्या. जळगाव-कुरंगी ही बस फलाटावर लागल्यानंतर प्रवाश्यांनी चढण्यासाठी गर्दी केली होती. यासोबतच अलका पाटील ह्या देखील बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील पोत तोडून लांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्याला पोत तोडण्यात यश न आल्याने त्याने तेथून पोबारा केला. घटना लक्षात येताच महिलेने आरडा-ओरडा केल्याने त्याठिकाणी प्रवाश्यांनी एकच गर्दी केली होती. या घटनेबाबत जिल्हा पेठ पोलिसांना माहिती मिळातच पोलिस कर्मचारी प्रशांत पाठक, शेखर पाटील, एएसआय शिवाजी वराडे, सिध्देश्‍वर दापकर यांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. यानंतर चालक मानसिंग विसन पदरेशी यांनी थेट बस प्रवाश्यांसह जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात नेण्यात आली. यानंतर पोलिस कर्मचार्‍यांनी घटनेची माहिती घेत प्रवाश्यांची चौकशी केली. दरम्यान, पोत चोरीला गेली नसल्यामुळे अलका पाटील यांनी तक्रार दाखल केली नाही. यानंतर दुपारी 2 वाजता जळगाव-कुरंगी ही बस पुन्हा आपल्या मार्गाला निघून गेली. तसेच आता मोटारसायकल चोरी, घरफोड्यांच्या घटनांच्या पाठोपाठ आता बसस्थानकावर पोत लांबविण्याच्या घटनांमध्येही वाढ होतांना दिसून येत आहे.