* प्रा. ए. बी. पाटील रांचे प्रतिपादन ; * मुजेत व्याख्यानाचे आयोजन
* साहित्र, कला व सांस्कृतिक मंडळाचे उद्घाटन
जळगाव । ‘जे भल्या-भल्यांना शाळा-महाविद्यालयांच्या शिक्षणातून लाभत नाही, अशी अलौकिक प्रातिभ शक्ती निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांना प्राप्त झाली होती. बहिणाईने आपल्या काव्यात या शक्तीद्वारे स्त्रियांचे व श्रमिकांचे भावविश्व साकार केले. भारतातील असे अनेक संत-महात्मे होऊन गेलेत की, त्यांना अशी प्रतिभा लाभलेली होती. अगदी मध्यकाळातील संत कबिरांपासून तर आधुनिक काळातील बहिणाबाई चौधरी पर्यंत अनेक दाखले देता येतील. बहिणाबाई जरी निरीक्षर असल्या तरी त्यांनी ‘मस्तकातील पुस्तकात आलं, पुस्तकातलं मस्तकात गेलं’ सांगून आपल्या मस्तकातील कल्पनांना उस्फुर्तपणे व्यक्त केले आणि ते सर्व अशिक्षित- सुशिक्षित सर्वांसाठी बावनकशी सोन ठरलं. त्या लोकाधारेच्या कवयित्री होत्या. बहिणाबाई चौधरी यांच्यासाठी गीता-भागवत, भगवंत कोण तर काळी माती, मातीतील पिके, शेतातील झाडे, त्यावरील पक्षी, शेतकरी वर्ग आणि स्त्रियांची सुख-दु:खे हे होतं. असे विचार मूळजी जेठा महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे असलेले प्रा.ए.बी.पाटील यांनी व्यक्त केलेत.
शिक्षण संस्कृतीची होणार भरभराट
प्रा. पाटील पुढे असे म्हणाले की, बहिणाईला कधी शब्दांची उणीव भासली नाही. त्यांनी साध्या-सोप्या शब्दांमध्ये मानवी जिवनाच तत्वज्ञान मांडलं. भाव,विचार आणि कल्पनेला वास्तवाची सुव्यवस्थित जोड दिली. ओठी आलेल्या गाण्यातून सारे यमक,अलंकार व प्रतिमा स्वाभाविकपणे प्रकटलेत. बहिणाईने खर्या अर्थाने श्रमाला व श्रमिकाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. अशा असाधारण स्त्रीशक्तीचे नाव आपल्या खानदेशच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास मिळाले आहे. निश्चितच, आगामी काळात विद्यापीठाच्या शिक्षण संस्कृतीची अजून भरभराट होईल यात शंका नाही.
विद्यार्थींनी सादर केल्या कविता
मू.जे.महाविद्यालयाच्या वतीने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी हे नाव देण्याचे औचित्य साधून साहित्य, कला व सांस्कृतिक मंडळाचा उद्घाटन, बहिणाबाई चौधरी :अलौकिक प्रतिभा या विषयावरील व्याख्यान तसेच बहिणाबाईच्या काही निवडक कवितांच्या वाचनाचा कार्यक्रम ह्युमिनिटी बिल्डींगमध्ये आयोजित करण्यात आला होता. नेहा पवार हिने आता ‘मला माझा जीव’ व ‘चुला पेटता पेटेना’ ह्या कविता सादर केल्या, तर वर्षा उपाध्ये या विद्यार्थांनीने ‘माझ्या माहेरची वाट’ व ‘आली पंढरीची दिंडी’ या कविता सादर केल्या.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थी असलेले उपप्राचार्य डॉ.सुरेश तायडे यांनी देखील उपस्थित तरुण – तरुणींना बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यातील सौंदर्यस्थळे यावर मार्गदर्शन केले. विचारमंचावर कला शाखेच्या समन्वयिका डॉ.प्रज्ञा जंगले उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन साहित्य, कला व सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख प्रा.विजय लोहार यांनी केले. कार्यक्रमाला समितीमधील सदस्य डॉ.मनोज महाजन, डॉ.भाग्यश्री भलवतकर, डॉ.रोशनी पवार आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.