बहुमत सिद्ध करा : राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
आमदार मुंबईकडे निघणार तर आघाडी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार
मुंबई : भाजपाने राज्यपालांकडे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आहे, त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगा, अशी मागणी केल्यानंतर राज्यपालांनीदेखील मुख्यमंत्री आणि विधान मंडळाला तसे पत्र दिले आहे. राज्यपाल यांनी पत्र दिल्यानंतर येत्या दोन दिवसात मुख्यमंत्र्यांना विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करावे लागेल.
आज मुंबईत येणार आमदार
दरम्यान, काही अपक्ष आमदार आज दुपारी गुवाहाटीहून मुंबईला रवाना होत आहेत, असे एका आमदाराने सांगितले. त्यानंतर टप्प्या टप्प्याने शिवसेनेचे आमदारही दाखल होतील. काही आमदारांना आधी गोव्यात पाठविले जाणार असल्याचे बोलले जात आहे.
11 जुलैला सुनावणी
दरम्यान, सुप्रीम कोर्टाने बंडखोर आमदारांवर निलंबन कारवाईला स्थगिती देत पुढील सुनावणी 11 जुलै रोजी ठेवली आहे. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्याची घाई नको म्हणुन महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने याचिका दाखल करून घेतली तर बहुमत चाचणी लांबू शकते.