पुणे : टूथपेस्ट, सौंदर्यप्रसाधने, साबण, चहा, कॉफी, शाम्पू, बिस्किटे, वॉशिंग पावडर या उत्पादनांची लहान आकाराची वस्तू व मोठ्या आकाराची वस्तू, याचे वजन, त्यावरील महत्तम विक्री किंमत (एमआरपी) याचा अभ्यास करण्यात आला असून त्यातून किमतीतील तफावत व ग्राहकांची लूट होत असल्याचे भीषण सत्य उजेडात आले. त्यात अनेक कंपन्यांमध्ये वस्तूंच्या व वजन किमतीमध्ये तफावत आढळून आली आहे. कमी वजनाच्या वस्तूच्या तुलनेत जास्त वजनाची वस्तू दीडपट ते दुपटीने महाग असल्याचे लक्षात आले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि ग्राहक पेठ यांच्या वतीने नुकतेच दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किमतीचे व वजनाचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामुळे प्रत्यक्ष वस्तूंच्या लहान-मोठया पॅकेटवरील किंमती व त्यातील किमतीची तफावत ग्राहकांसमोर मांडण्यात आली आहे. टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठेने याकरीता पुढाकार घेतला असून ग्राहकांमध्ये जनजागृती केली जात आहे.
ग्राहक पेठेतर्फे बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून होणारी लूट याविषयावरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. याचे उद्घाटन भाऊसाहेब पोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी एस.आर.कुलकर्णी, सूर्यकांत पाठक उपस्थित होते.
पाठक म्हणाले, एखादी वस्तू 5 रुपये अडीचशे ग्रॅम असेल, तर तिची 1 किलोची किंमत 20 रुपये अपेक्षित असते. मात्र एक किलोला 40 रुपयांपर्यंत किंमत आकारली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना एकावर एक वस्तू फ्री देऊनही कंपन्या अधिक फायद्यात असतात. म्हणजेच 100 ग्रॅम चहा 30 रुपये असेल, तर 1 किलो चहा 300 रुपये असायला हवा. त्याऐवजी 430 रुपये अशा किमतीला विक्री होत आहे. विविध कंपन्यांकडून मॉलमध्ये सेलच्या नावाखाली विविध योजना जाहीर केल्या जातात. त्यामध्ये बर्याच वेळा मॉलमध्ये जास्त वजनाच्या वस्तूवर अशाप्रकारे एमआरपी वाढवून दिल्या जातात आणि मग त्यावर सूट दिली जाते. नवीन वर्ष आणि 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर अनेक योजना दिल्या जाऊ शकतात, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. हे प्रदर्शन 7 जानेवारीपर्यंत सुरू आहे.