पुणे : फार मोठा गाजावाजा केलेल्या स्मार्ट सिटी योजनेतील बाणेर, बालेवाडी भागातच पाणी नसल्याने बांधकामांवर न्यायालयाने बंदी घातल्याने भारतीय जनता पक्षाची चांगलीच गोची झाली आहे. भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनीच न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्याने भाजपच्या नेत्यांची एकूण प्रकरणावर सारवासारव करण्यात धावपळ होत आहे. स्मार्ट सिटी योजनेत पथदर्शी प्रकल्प म्हणून बाणेर, बालेवाडी भागाचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला. त्यावेळी या विकसित भागाची निवड का झाली असा आक्षेप घेण्यात आला होता. शहराच्या पेठा अविकसित आहेत त्या योजनेत पहिल्या घ्याव्यात असे म्हटले गेले. पण बालवडकर यांनी या कथित विकसित भागातील पाणी समस्येवर बोट ठेऊन आपल्या पक्षालाही जाणीव करून दिली.
बाणेरच्या पाणी समस्येवर उपाय काय?
भाजपने सध्या समान पाणी पुरवठा हा विषय प्राधान्याने हाती घेण्याचे ठरविले आहे. याकरिता कर्जरोखेही काढले आहेत, परंतु योजना प्रत्यक्षात पूर्ण होण्यास तीन वर्षाचा तरी कालावधी लागणार आहे. तोपर्यंत बाणेरवासीयांनी काय करायचे या प्रश्नाचे उत्तरही भाजपला आता ध्यावे लागेल. केवळ पाणीच नव्हे तर यापुढे बाणेरमधील अनेक समस्या लोक मांडू लागतील अशावेळी सत्ताधारी पक्ष म्हणून थातूर मातूर उत्तर देऊन चालणार नाही. बाणेरच्या पाणी समस्येवर तातडीने कोणत्या उपाययोजना करणार हे भाजपला कृतीतून दाखवून द्यावे लागणार आहे.