बांधकाम कामगारांनी नव्याने नोंदणी करणे आवश्यक

0

मुंबई । कामगार विभागांतर्गत येणार्‍या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबवण्यात येणार्‍या बांधकाम कामगारांच्या ‘विशेष नोंदणी अभियाना’चा ई-शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आला. महाराष्ट्र इमारत व इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या विशेष नोंदणी अभियानांतर्गत 25 लाख कामगारांची नोंदणी करण्याचे लक्ष्य कामगार विभागाने पूर्ण करावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. राज्यातील बांधकाम कामगारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करावी, असे आवाहन कामगार मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर यांनी सह्याद्री येथे केले.

कामगार विभागांतर्गत येणार्‍या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणार्‍या बांधकाम कामगारांच्या ‘विशेष नोंदणी अभियाना’चा ई शुभारंभ आज करण्यात आला. आज महाराष्ट्रात जवळपास 25 लाख इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात कामगार असून या कामगारांना आजपासून सुरू करण्यात आलेल्या अटल विश्‍वकर्मा सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात कार्यरत बांधकाम कामगारांपैकी ज्या बांधकाम कामगारांनी अद्याप मंडळाकडे नोंदणी केलेली नाही, अशा बांधकाम कामगारांना मंडळाकडे नोंदणी करता यावी याकरिता मुंबईत 24 ठिकाणी, पुणे येथे 25 ठिकाणी, नाशिक येथे 14 ठिकाणी, औरंगाबाद येथे 10 ठिकाणी, अमरावती येथे 6 ठिकाणी आणि नागपूर येथे 17 ठिकाणी असे सर्व मिळून 96 ठिकाणी विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. विशेष नोंदणी अभियानांतर्गत 28 योजनांचा लाभ कामगारांना घेता येणार असून हे अभियान 23 फेब्रुवारी 2018 ते 23 मार्च 2018 असे महिनाभर सुरू राहणार आहे.